बाल तस्करीच्या संशयावरून मदरशातील २२ अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या ताब्यात : चौकशीनंतर बालगृहात रवानगी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बाल तस्करीच्या संशयावरून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मदरशातून आलेल्या २२ अल्पवयीन मुलांना नागपूर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शुक्रवारी सकाळी काही काळ नागपूर रेल्वे स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर या सर्व मुलांना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून पाटणकर चौकातील शासकीय बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबतचा निर्णय पुढील चौकशीनंतर घेतला जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर २२ अल्पवयीन मुले एका मौलाना व एका केअर टेकरसोबत उभी असल्याचे स्टेशन मास्तरच्या निदर्शनास आले. हे सर्व २४ जण अमृत भारत एक्सप्रेसने बिहारमधील पूर्णीया जिल्ह्यात जाणार होते. ट्रेन येण्यास वेळ असल्याने ते स्थानकावर प्रतीक्षा करत होते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने मुले असूनही त्यांच्यासोबत पालक नसल्याने स्टेशन मास्तरला संशय आला. त्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस, चाईल्ड लाईन तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाला पाचारण केले.
पथकाने घटनास्थळी पोहोचून मुलांची, मौलानांची व केअर टेकरची सखोल चौकशी केली. चौकशीत ही सर्व मुले यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मदरशामध्ये शिक्षण घेत असल्याचे समोर आले. फेब्रुवारी महिन्यात रमजान असल्याने मदरशाला सुट्ट्या लागल्या असून मुले बिहारमधील पूर्णीया जिल्ह्यातील आपापल्या घरी जाण्यासाठी निघाल्याचे मौलानांनी सांगितले. त्यांनी मदरशाची कागदपत्रे तसेच स्थानिक नगरसेवकाचे पत्र अधिकाऱ्यांना सादर केले.
यानंतर चाईल्ड लाईन आणि रेल्वे पोलिसांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. मात्र, सायंकाळपर्यंत मोजक्याच पालकांशी संपर्क होऊ शकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शासकीय बालगृहात हलविण्यात आले.
मुले अल्पवयीन, कागदपत्रांबाबत शंका -
सर्व मुले अल्पवयीन असून काहींच्या बाबतीत पुरेशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने बाल तस्करीचा संशय काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जीआरपीकडे तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, ज्या पालकांशी संपर्क झाला त्यांनी दिलेली माहिती आणि मौलानांनी दिलेली माहिती एकसारखी असल्याने, उर्वरित पालकांशी संपर्क झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, मौलानाकडे २२ मुलांसह एकूण २४ जणांची वैध रेल्वे तिकिटे आढळून आली असून मदरसा तसेच स्थानिक नगरसेवकांचे पत्रही उपलब्ध आहे. काही पालकांनीही आपली मुले शिक्षणासाठी आर्णी (जि. यवतमाळ) येथील मदरशात पाठविल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबत माहिती देताना रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी सांगितले की, प्रकरण अत्यंत संवेदनशील असून त्याचे अनेक पैलू तपासले जात आहेत. चाईल्ड लाईनकडूनही चौकशी सुरू आहे. सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
News - Nagpur




Petrol Price




