महत्वाच्या बातम्या

 प्रोजेक्ट उडान अंतर्गत ११५ आश्रम शाळांमध्ये वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा : २४,८०७ विद्यार्थ्यांचा सहभाग


- अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी पाच महिन्यांचा उपक्रम

- आज अंतिम परीक्षा उत्साहात संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ व्हावी तसेच वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत आयोजित करण्यात आलेली वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम परीक्षेला जिल्ह्यातील ११५ आश्रम शाळांमधील तब्बल २४,८०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली PRAYAS (Police Reaching Out to Youths & Students) या उपक्रमांतर्गत या स्पर्धेच्या सहाव्या टप्प्याची सुरुवात १२ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी हा उपक्रम सातत्याने राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ११५ शासकीय व निमशासकीय आश्रम शाळांमधील प्रत्येकी एक समन्वयक शिक्षक तसेच संबंधित पोस्टे, उपपोस्टे व पोमके हद्दीतील समन्वयक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग घेण्यात आला. PRAYAS (सामान्य ज्ञान) व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दररोज १० प्रश्न शाळांना पाठविले जात होते. समन्वयक शिक्षक हे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून उत्तरे व त्यामागील स्पष्टीकरण दैनंदिन परिपाठामध्ये समजावून सांगत होते.

आज, २२ जानेवारी २०२६ रोजी या उपक्रमाची अंतिम परीक्षा पार पडली. गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे पोमके गर्देवाडा हद्दीतील भगवंतराव आश्रम शाळेतील २० विद्यार्थी तसेच अतिदुर्गम भामरागड उपविभागातील २,३९६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी परीक्षेदरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, गडचिरोली तसेच एकलव्य रेसिडेन्शिअल इंग्लिश मिडीयम स्कूल, चामोर्शी येथे भेट देऊन परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे व पोमकेंचे प्रभारी अधिकारी, आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, समन्वयक शिक्षक तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोअं. रविंद्र कंकलवार व सर्व पोलीस अंमलदारांनी मोलाचे सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos