सुरजागड यात्रा झाली दारू व तंबाखूमुक्त


- जत्रा समिती, जनता व मुक्तिपथच्या प्रयत्नांना यश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे ओअदालपेन ठाकूरदेव यात्रा ५ ते ७ जानेवारी दरम्यान पार पडली. यात्रेमध्ये जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासीबांधवही मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेचे विशेष म्हणजे,सुरजागड इलाका प्रमुख सैनु गोटा, जत्रा समिती, मुक्तिपथ व परिसरातील जनतेच्या प्रयत्नातून ही यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. यासाठी इलाक्यातील ७२ गावांतील पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य केले आहे.
धार्मिक ठिकाणी कुणीही दारू किंवा खर्रा सेवन करून येऊ नये, यासाठी सुरजागड येथील यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी देवस्थान समिती व परिसरातील जनतेच्या सहकार्याने मुक्तीपथ अभियानातर्फे सलग तीन दिवस जनजागृती करण्यात आली. यात्रेच्या ठिकाणी बॅनर तसेच व्हिडीओ वॅनच्या माध्यमातून दारू व खर्रा सेवनाचे दुष्परिणाम सांगत सुव्यवस्थित यात्रा पार पाडण्यासाठी प्रयत्न केला गेला. मार्कंडा  व चपराळा यात्रेप्रमाणेच सुरजगडची यात्रा देखील दारू व तंबाखूमुक्त करण्यात आली. यासाठी पारंपारिक इलाका समितीच्या बैठकीत ठराव घेऊन दारू व तंबाखूचे सेवन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविले होते. यात्रेदरम्यान दुकानातून तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची निवड सुद्धा करण्यात आली होती. यामुळे कोणीही खर्रा किंवा दारू पिऊन दिसला नाही. 
यात्रेदरम्यान सुरजागड इलाका प्रमुख सैनु गोटा,  सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद बंग, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक किशोर मलेवार, पूजा येलूरकर, साईनाथ मोहुर्ले, डॉ. राकेश नागोसे, डॉ. कन्नाके, डॉ. मेश्राम, डॉ. नंदू मेश्राम, गणेश कोलगिरे, राकेश ढवळे यांनी भेट देऊन पारंपरिक गोटुल समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच यात्रेत फिरून दुकानांची तपासणी केली असता एकाही दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होताना दिसली नाही. यामुळे मुक्तीपथच्या प्रयत्नांतून सुरजागडची यात्रा  दारू व तंबाखूमुक्त झाली आहे.  
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-01-07


Related Photos