महत्वाच्या बातम्या

 रेल्वे अपघातांची धक्कादायक आकडेवारी : नागपूर विभागात २९४ जणांचा मृत्यू, ४८६ जनावरांचे बळी


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : रेल्वे अपघात म्हटला की अंगावर शहारे येतात. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये देशभरात रेल्वेचे एकूण ११ अपघात घडले. यापैकी चार मोठ्या अपघातांत ३० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. मात्र, याहूनही अधिक भीषण वास्तव समोर आले असून, ते रेल्वे गाड्या एकमेकांना न धडकता घडलेल्या अपघातांचे आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गेल्या वर्षभरात विविध मार्गांवर रेल्वेच्या धडकेत तब्बल २९४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत रेल्वेच्या धडकेत ४८६ मुक्या जनावरांचेही बळी गेले आहेत. ही काळजाचे पाणी करणारी आकडेवारी असून, या अपघातांनी सर्वसामान्य नागरिकांसह रेल्वे प्रशासनालाही धडकी भरवली आहे.

२०२५ मधील प्रमुख रेल्वे अपघात -
बिलासपूर रेल्वे अपघात (४ नोव्हेंबर २०२५) – छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ मेमू पॅसेंजर ट्रेन उभ्या असलेल्या मालगाडीला मागून धडकली. या भीषण अपघातात किमान डझनभर जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले.

जळगाव रेल्वे दुर्घटना (२२ जानेवारी २०२५) – महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आग लागल्याच्या अफवेने घाबरून काही प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या ट्रॅकवरून वेगाने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिल्याने किमान १३ जणांचा मृत्यू झाला.

मुंबई लोकल अपघात (९ जून २०२५) – प्रचंड गर्दीमुळे मुंबई लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले.

बिहार मालगाडी अपघात (२७ डिसेंबर २०२५) – बिहारच्या जमुई जिल्ह्यातील लाहाबन व सिमुलतला स्थानकांदरम्यान मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ही आकडेवारी अत्यंत थरारक असल्याने रेल्वे प्रशासन व सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्यात येत असून, रेल्वे ट्रॅकच्या शेजारी राहणाऱ्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ट्रॅकजवळून ये-जा करताना तसेच जनावरांना ट्रॅकच्या शेजारी चरण्यासाठी नेऊ नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos