महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीतील पोलिस हत्येतील नक्षली आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोलीतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणातील कथित नक्षली आरोपी अनिल उर्फ रसूल सुकानू सोरी (२८) याला ठोस पुरावे नसल्यामुळे निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. न्यायमूर्तीद्वय अनिल पानसरे आणि राज वाकोडे यांनी हा निर्णय सुनावला.

सोरी हा छत्तीसगडमधील रहिवासी असून, २२ मार्च २०१५ रोजी गडचिरोली पोलिसांवर नक्षलविरोधी मोहिमेत असताना मुसपारसीजवळच्या घनदाट जंगलात ६०-७० नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी ठार झाले तर दहा अन्य गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर पोलिसांनी माहितीच्या आधारावर सोरीला अटक केली आणि त्याच्यावर सत्र न्यायालयात खटला दाखल केला. १ फेब्रुवारी २०२१ रोजी सत्र न्यायालयाने सोरीला जन्मठेपेची कमाल शिक्षा दिली होती.

मात्र, या निर्णयाविरुद्ध सोरीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने त्याचे अपील मंजूर करून निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला. या प्रकरणी सोरीचे वकील अॅड. राहुल हजारे यांनी त्याचे समर्थन केले.





  Print






News - Nagpur




Related Photos