आंध्र–ओडिशा सीमेजवळ सुरक्षा दलांची मोठी कारवाई : सात नक्षल्यांचा खात्मा


- टेक शंकरसह तांत्रिक शाखेची मोठी हानी
- वाढत्या हालचाली रोखण्यासाठी निर्णायक मोहिम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आंध्र–ओडिशा आणि छत्तीसगड सीमेवर सलग दोन दिवसांत सुरक्षा दलांनी केलेल्या धारदार कारवाईत नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. छत्तीसगड–आंध्रप्रदेश सीमेवरील १८ नोव्हेंबरच्या चकमकीत पोलिटब्युरो सदस्य व कुप्रसिद्ध कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे ऊर्फ राजक्का आणि चार माओवादी ठार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आंध्र–ओडिशा सीमेवर सात जहाल नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. मृतांमध्ये आंध्र-ओडिशा बॉर्डर स्पेशल झोनल कमिटीच्या तांत्रिक शाखेचा प्रमुख मेटुरू जोगाराव ऊर्फ टेक शंकरचा समावेश आहे.
टेक शंकर हा नक्षल संघटनेचा अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मेंदू मानला जात असे. लैंडमाइन, स्फोटके, वायरिंग, संचार तंत्रज्ञान आणि शस्त्रनिर्मितीमध्ये त्याला प्रावीण्य होते. छत्तीसगड आणि आंध्र–ओडिशा भागातील अनेक मोठे आयईडी स्फोट त्याच्या डिझाइनमुळे घडवले गेल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
नक्षल गटांचे आंध्रप्रदेशात स्थलांतर रोखण्यासाठी सतत छापे -
छत्तीसगडमधील दबाव वाढल्याने काही नक्षल गट आंध्र प्रदेशातील घनदाट जंगल भागात स्थलांतर करण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठे सर्च ऑपरेशन उघडले. या कारवाईमुळे नक्षल संघटनेच्या तांत्रिक पायाभूत शक्तीवर मोठा आघात झाला असून भविष्यातील स्फोटक हल्ल्यांची क्षमता डळमळीत झाल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
सीमेवरील हालचाली वाढल्या; ग्रेहाउंड्सची संयुक्त मोहीम -
आंध्र–ओडिशा सीमाभागात गेल्या काही महिन्यांत नक्षलवादी हालचालींमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळत होती. नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडकडून येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ग्रेहाउंड्ससह विविध सुरक्षा पथकांनी मंगळवारी व्यापक मोहिम छेडली. बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी निर्णायक वाढ मिळवली.
५० नक्षल्यांना अटक; प्रचंड शस्त्रसाठा जप्त -
आंध्रप्रदेशातील एनटीआर, कृष्णा, काकीनाडा, कोनसीमा आणि एलुरू जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी गेल्या काही दिवसांत एकूण ५० माओवादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटकेत केंद्रीय समिती, राज्य समिती, एरिया कमिटी तसेच प्लाटून स्तरावरील महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान ४५ रायफल/बंदुका, २७२ जिवंत काडतुसे, २ मॅगझीन, ७५० ग्रॅम वायर, तांत्रिक उपकरणे व विविध दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
सततच्या संयुक्त कारवाईमुळे नक्षल चळवळीचा दबदबा कमी करण्याकडे सुरक्षा दलांनी महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले असून सीमाभागातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी या कारवाया निर्णायक मानल्या जात आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




