आरोग्य, सेवा व जनजागृतीचा संगम : नारगुंडा येथे भव्य आरोग्य मेळावा


- पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रम ग्रामस्थांच्या सेवेसाठी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : पोलीस प्रशासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत आणि दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नारगुंडा पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी भव्य आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन मा. श्री. निलोत्पल सर, पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. श्री. एम. रमेश सर, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), मा. श्री. गोकुळ राज सर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. कार्तिक सर, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) व मा. श्री. अमर मोहिते सर, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रभारी अधिकारी निखिल वाघोले यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती देत दादालोरा खिडकीतून शासनाच्या विविध लाभदायी योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
आरोग्य विभागाकडून मोबाईल मेडिकल युनिटच्या डॉ. अंकिता सहारे, ब्लड डोनेशन कॅम्पचे डॉ. निखिल कोडापत्ती व किअर सब सेंटरच्या डॉ. मनीषा मज्जी यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तसेच डॉ. कोडापत्ती यांनी रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगत ग्रामस्थांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.
मेळाव्यात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला. त्यात फार्मर आयडी - ११, नवीन आधार कार्ड - ८, आधार अपडेट - ४६, आय.पी.बी.पी. खाते - १३, सुकन्या योजना - ७, साडी वाटप - ९० नग, गोल्डन कार्ड - ८५, आरोग्य तपासणी - १७३, रक्तदान - २५, ७/१२ ऑनलाईन प्रिंट - २४, झेरॉक्स प्रती - सुमारे २००, लाडकी बहीण ई-केवायसी - ७८, तसेच सुमारे ३० हजार रुपयांचा कॅश विड्रॉल अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना मिळाला.
सदर आरोग्य मेळाव्यास नारगुंडा हद्दीतील २५० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्व उपस्थितांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्धपणे पार पडला.
मेळाव्याचे सूत्रसंचालन पो.अं. केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन पो.उपनि. रामा सरपे यांनी केले. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
News - Gadchiroli




Petrol Price




