नागपूरातीलही शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार : मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
राज्यात नववी आणि बारावीच्या शाळा  सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यापाठोपाठ आता नागपूर महानगर पालिका  क्षेत्रातीलही  सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहे, असा निर्णय मनपा आयुक्तांनी घेतला आहे.
दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील, असे आदेश दिले होते. त्यानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती.
मात्र, दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी जारी केला आहे. विशेष म्हणजे, अनेक शिक्षकांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे, नागपुरात झालेल्या जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या कोरोना चाचणीमध्ये 41 शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बाबसमोर आली आहे. गुरुवारपर्यंत फक्त 30 टक्के शिक्षकांच्या चाचण्या झाल्या आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या. त्यामुळे पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या वाढणार हे निश्चित आहे.
9 ते 12 वर्गाच्या शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 22 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची टेस्ट करून, त्याचा अहवाल विभागाला द्यायचा आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील कोरोनाच्या तपासणी केंद्रावर मोठ्या संख्येने शिक्षक टेस्टसाठी आले होते. सध्या शिक्षण विभागाकडे  ज्या शिक्षकांनी टेस्ट केली, त्यांचे अहवाल आले आहे. त्या अहवालानुसार, शहरात 16 व ग्रामीणमध्ये 25 असे 41 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2020-11-22


Related Photos