महत्वाच्या बातम्या

 पिक विम्याच्या लाभासाठी नुकसानीची माहिती कळविण्याचे आवाहन



विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अतिवृष्टी व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी नुकसानीची माहिती वेळीच विमा कंपन्यांना कळविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अद्यापही कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. सद्या सोयाबीन पिक कापणीच्या अवस्थेत आहे. अचानक पडणाऱ्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे अवेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवले. या खरीप हंगामात जिल्ह्यातील एकुण २७ हजार २ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपिट, भुस्खलन, विमा संरक्षितक्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिंक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ही विमा कंपनी कार्यरत आहे. कंपनीला नुकसानीची माहिती देण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहे. क्रॉप इन्शुरन्स द्वारे शेतकरी नुकसानीची माहिती देऊ शकतात. विमा कंपनी टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२, विमा कंपनीचा ई-मेल customersupportba@icicilombard.com, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या ठिकाणी नुकसानीची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुलै व ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी पूर्वसूचना दिली असेल तरी देखील चालु आठवड्यात पडणाऱ्या पावसामुळे नुकसान झाले असलेल्या विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ तालुका स्तरावर कंपनीचे प्रतिनिधींना सुचित करावे किंवा कृषि सहाय्यकांची मदत घेऊन तक्रार घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत वरील पर्यायाचा वापर करून पुन्हा पुर्वसूचना द्याव्यात जेणेकरून तात्काळ पंचनामे करता येतील व पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा संरक्षण मिळविता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे 







  Print






News - Wardha




Related Photos