आवागमन करण्यास होत असलेली अडचण भूसेवाडा वासीयांनी मिटवीली, श्रमदानातून उभारला 'सेतु'


- बांबूपासून तयार केलेल्या पुलामुळे मिटली चिंता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड
: तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी नदी - नाल्यांमधून जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात नागरीकांना, कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे गावकरी आपल्या आवागमनासाठी वेगवेळे प्रयोग करून पाहतात. असाच प्रयोग मलमपोड्डूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भुसेवाडा येथील नागरीकांनी केला असून त्यांनी उभारलेल्या बांबूच्या ‘सेतु’ मुळे आवागमनाची चिंता मिटली आहे.
मल्लमपोड्डूर आणि भुसेवाडा या दोन गावांच्या मधोमध गावापासून दोन किमी अंतरावर बारमाही वाहणारा नाला आहे. या नाल्याला बाराही महिने पाणी राहत असल्यामुळे कर्मचारी आणि नागरीकांना पाण्यातून वाट काढत जावे लागते. अशातच रात्री - अपरात्री कोणी बिमार पडल्यास मोठी अडचण उभी ठाकते, आशा वर्कर, आरोग्य कर्मचार्यांना माहिती देण्यासाठी जाण्याकरीता कमरेभर पाण्यातून जावे लागते. तसेच शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांना दररोज पाण्यातूनच आवागमन करावे लागते. यावर काही तोडगा काढावा यासाठी ग्रामसेवक अविनाश गोरे यांनी १५ ऑक्टोबर रोजी गावात सभा घेतली. या सभेत रस्त्याबाबत सविस्तर चर्चा केली. या सभेत महिलाही सहभागी झाल्या होत्या. सभेमध्ये सविस्तर चर्चेअंती कर्मचारी आणि नागरीकांनी लोकसहभागातून बांबूचा पुल तयार करण्याचे ठरविले. सर्वांच्या सहभागातून सर्व साहित्य गोळा करून काल २० ऑक्टोबर रोजी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी सरपंचा अरूणाताई वेलादी, ग्रामसेवक अविनाश गोरे, अंगणवाडी सेविका शेवंता कुमरे, आशा सेविका वेलादी, ग्रामपंचायत कर्मचारी साईनाथ गव्हारे, अरूणा काळंगा, गावकरी रामा ओक्सा, मनोहर ओक्सा, जगदिश पल्लो, मंगरू वड्डे व समस्त गावकरी यांनी मोटारसायकल जावू शकेल एवढ्या रूंदीचा बांबूचा पुल तयार केला. या पुलाच्या निर्मितीमुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-10-21


Related Photos