रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच


-  अखंडित विदयुत पुरवठयासाठी कॅपॅसिटर बसविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
सध्या रब्बी हंगाम तोंडावर आहे. शेतीला सिंचनासाठी सुरळीत विदयुत पुरवठयाची आवश्यकता असते. त्यादृष्टीने महावितरण प्रयत्नशील आहे. दरम्यान नादुरुस्त किंवा दुरुस्त रोहित्राच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराशी किंवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करु नयेत. वाहन व्यवस्थेची तरतूद रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सी किंवा महावितरणकडे आहे. शिवाय, मंजुर भारापेक्षा अधिक विदयुत भाराच्या वापरामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांनी प्रमाणीत कॅपॅसिटर बसवून अखंडित वीज वापराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.
अखंडित आणि सुरळीत विदयुत पुरवठयाचा लाभ घेण्यासाठी कृषीपंप ग्राहकांनी त्यांच्या वीज पंपापवर ॲटो स्विच बसवू नयेत. त्यामुळे कृषीपंप जळण्याची आणि रोहित्रही नादुरुस्त होण्याची शक्यता अधिक असते. याचा फटका या रोहित्रावरील कृषी ग्राहकास बसतो. रोहित्रावर असलेले अनधिकृत कृषीपंप व मंजुर भारापेक्षा जास्त भार असलेले कृषीपंप काढून टाकावेत. अनधिकृत वीज वापर करीत असलेल्या कृषीपंप धारकास तसेच अधिक भार जसे की, 3 एचपी मंजुर असताना 5 एचपीचा पंप वापरणे अशा कृषीपंप धारकांनी वीज पुरवठया करिता किंवा अतिरिक्त भाराकरीता अर्ज करुन नियमाने वीज जोडणी घ्यावी व वीज कायदा 2003 चे पालन करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कृषीपंपास नामांकित कंपनीचे  आयएसआय मानांकन असलेले कॅपॅसिटर बसविण्यात यावे. कॅपॅसिटर हा शेतकऱ्यांच्या पंपाचे आणि रोहित्राचेही बिघाड टाळतो. त्यामुळे शेतीला अखंडित वीज पुरवठा करणे सोयीचे होणार आहे. याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-10-13


Related Photos