१० हजार रूपयांची लाच स्विकारतांना पोलिस उपनिरीक्षक व पोलिस शिपाई अडकले एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारूबंदिचा गुन्हा नोंद न करता प्रतिमहा १० हजार रूपये हप्ता प्रमाणे लाचेची मागणी स्विकारतांना गडचिरोली जिल्हयातील पोलिस मदत केंद्र घोट ता. चामोर्शी येथिल पोलिस उपनिरीक्षक हनुमंत विलास तरटे (३५) व पोलिस शिपाई सतिश उकंउ जाधव (३०) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
प्राप्त माहितीनुसार यातील तक्रारदार हे शेतीचा व्यवसाय करत असून ते विष्णुपुर ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील रहिवासाी आहेत. तक्रारदार हे स्वताः ला पिण्याकरिता शेताजवळ असलेल्या जंगलात मोहफुलाची दारू तयार करतात. पोलिस मदत केंद्र घोट येथील पोलिस उपनिरीक्षक हनुमंत विलास तरटे व पोलिस शिपाई सतिश उकंड जाधव हे तक्रारदार यांच्या शेताजवळील जंगलात आले असता त्यांना मोहफुलाची हातभटटी सुरू दिसली. तक्रारदारास मोहफुलाची दारू विक्रीचा धंदा करतो असे म्हणून तक्रारदारावर दारूबंदिचा गुन्हा नोंद न करण्याकरिता प्रतिमहा १५ हजार रूपये हप्ता प्रमाणे लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली.
पोलिस निरीक्षक रवि राजुलवार यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये काल ७ ऑक्टोबर २०२० रोजी पडताळणी दरम्यान पोलिस उपनिरीक्षक हनुमंत विलास तरटे यांनी तक्रारदारास दारूबंदीचा गुन्हा नोंद न करण्याकरिता प्रतिमहा १५ हजार रूपये हप्ताप्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रूपये लाच रक्कम पोलिस शिपाई सतिश उकंड जाधव यांच्या हस्ते तळोधी बस स्टॅंन्ड ता. चामोशी जि. गडचिरोली येथे दुचाकी वाहनावर स्विकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहाथ पकडले. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत विलास तरटे व पोलिस शिपाई सतिश उकंड जाधव विरूध्द पोलिस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवि राजुलवार, नापोशि सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोशि महेश कुकुडकर व चानपोशि तुळशिराम नवघरे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-10-08


Related Photos