हाथरस प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे : आ. प्रताप सरनाईक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
हाथरस बलात्कार प्रकरण योगी सरकारने अत्यंत बेजाबाबदारपणे, अमानवी पद्धतीने हाताळल्याचे  दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबईत गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.
१४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार करण्यात आले. आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठत तरुणीची जीभ कापली. एकीकडे पाशवी अत्याचारानंतर तरुणीच्या मृत्यूनंतरही विटंबना सुरुच होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्रीतच कुटुंबीयांना न सांगता तरुणीवर अंत्यसंस्कार केले. यानंतर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. तर पीडितेच्या कुटुंबाला घरातच डांबून मीडियाशीही बोलू देत नाही. प्रशासनाकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. इतकंच काय वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना कुटुंबीयांना भेटू दिले  जात नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशचं योगी सरकार आणि यूपी पोलीस नेमके काय लपवत आहेत, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.
त्याच अनुषंगाने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेशला पाठवावे, अशी मागणी केली. सरनाईक म्हणाले की, "जर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलीस गुन्हा दाखल करुन मुंबईत येऊ शकतात, मग हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन करावा, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी ताबडतोब यावर कारवाई करावी, अशी विनंती मी करतो."
  Print


News - Rajy | Posted : 2020-10-02


Related Photos