महत्वाच्या बातम्या

 सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार : पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील ३३ जिल्ह्यात एक लाख ७८ हजार ७२ गोवर्गीय जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत १०० टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लंपी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे-पाटील बोलत होते. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लंपी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने १०० टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्विकारल्या आहेत.
आर्थिक मदतीबाबत शासन सकारात्मक : पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय ३० हजार, बैल २५ हजार आणि वासराला १६ हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
कायमस्वरूपी विमा योजना सुरू करणार : राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे विखे पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आतापर्यंत ३३८३.८५ लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना१५ दिवसात मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना विखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रवीण दराडे, महादेव जानकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.





  Print






News - Nagpur




Related Photos