पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून दोघांची हत्या केल्याप्रकरणी जहाल नक्षल्यास जन्मठेप


- १५  हजारांचा दंडही ठोठावला
- जिल्हा व सत्र न्यायाधिश ३ बी.एम. पाटील यांचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून २५  एप्रिल २०१६  रोजी दोन नागरीकांची हत्या केल्याप्रकरणी जहाल नक्षली निलेश उर्फ अजित सावजी पोटावी (२४)  रा. मरकेगाव ता. धानोरा याला जन्मठेप व १५  हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. 
२२  एप्रिल २०१६  रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान आरोपी निलेश व त्याच्या नक्षल साथीदारांनी हूऱ्यालदंड  येथील गांगसु बुधू कुमोटी (४१)  तसेच खामतळा येथील मतकुरशाहा सनकु होळी (४२)  या दोघांना घरून घेवून गेले होेते. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेत जवळपास ५०  ते  ६० नक्षल्यांचा समावेश होता. टिपागड दलम, कुरखेडा दलम आणि खोब्रामेंढा दलमच्या नक्षल्यांनी ही घटना घडवून आणली होती. 
२५  एप्रिल २०१६  रोजी दोघांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांचे मृतदेह कोसमटोला कडे जाणार्या मार्गावर टाकून देण्यात आले होते. तसेच नक्षली पत्रकेसुध्दा घटनास्थळी आढळून आले होते. यामध्ये दोन्ही मृतक पोलीसांना माहिती पुरवितात, असे नमुद करण्यात आले होते. याबाबत मृतक गांगसु याच्या काकाने मालेवाडा पोलीस मदत केंद्रात फिर्याद दाखल केली होती. पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक दिपक बाबुराव वारे यांनी तपास पूर्ण करून आरोपींविरूध्द सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश बी.एम. पाटील यांनी आज निकाल दिला असून साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीस कलम ३०२  भादंवि मध्ये जन्मठेप व ५ हजार रूपये दंड, कलम ३६४  भादंवि मध्ये १०  वर्ष कारावास व ५ हजार रूपये दंड, कलम १४८  भादंवि मध्ये ३  वर्ष कारावास व ५  हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-22


Related Photos