भंडारा शहरातील ६ खाजगी रूग्णालयांना कोविड केअर हॉस्पिटलसाठी मंजूरी : उपचारासाठी १६० बेड्स उपलब्ध


- गरोदर मातांची होणार भंडाऱ्यात ट्रिटमेंट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  :
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने खाजगी रूग्णालयांना कोविड केअर हॉस्पिटलसाठी मंजूरी दिली असून गरोदर मातांच्या ट्रिटमेंटसह 160 बेड उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी खाजगी रूग्णालयांना मंजूरी दिल्यामूळे कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण झाल्या आहेत.
भंडारा शहरातील राजदीप चौधरी रूग्णालय 25, अशोका हॉटेल 60, हॉटेल रॉयल प्लाझा 15, श्रीकृपा हॉस्पिटल 15, पडोळे हॉस्पिटल 15 व प्रयास हॉस्पिटल 30 अशा एकूण 160 बेडचे कोविड केअर हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात आली आहे. या शिवाय शासकीय रूग्णालयात बेडची व्यवस्था पुर्वीच करण्यात आली आहे.
गरोदर महिला पॉझिटीव्ह निघाल्यास भंडारा येथे उपचाराच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या उपचारासाठी रूग्णांना नागपूर येथे न्यावे लागत होते. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने आता ही सुविधा भंडारा येथे न्यु लाईफ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी गरोदर महिलांची प्रसुती व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डॉ. सुयोग मेश्राम, डॉ.ओम गिऱ्हेपुंजे व डॉ. एस.आर. सेलोकार हे उपचार करणार आहे. गरोदर महिलांच्या उपचाराची व्यवस्था भंडारा येथे झाल्यामुळे अनेक रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
साधनांची कमी नसून मनुष्यबळाचा थोडा आभाव असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आरोग्य प्रशासनाने 36 नर्संना नियुक्ती दिली असून त्यापैकी 31 नर्संनी पदभार स्विकारला आहे. ऑक्सीजन व व्हँटिलेटरची कमतरता नाही. अतिरीक्त सिलेंडरची मागणी नोंदविली असून ते लेवकर प्राप्त होतील असे ते म्हणाले. त्याच प्रमाणे जम्बो 200 सिलेंडरसुद्धा मागविले आहेत. खाजगी रूग्णालयाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोविड ट्रिटमेंटसाठी  शासनाने खाजगी रूग्णालयाचे दर निश्चित केले आहेत. कोविड व्यतिरिक्त इतर आजाराच्या उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर टाळाटाळ करतात ही बाब निदर्शनास आली असून कोविड चाचणीची प्रतिक्षा न करता अन्य आजारावरील उपचार तातडीने सुरू करावेत असे निर्देश जारी करण्यात येतील असे ते म्हणाले.
भंडारा जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गरोदर महिलांनी अधिक काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. जिल्हयात 18 गरोदर महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बाब माता व शीशू साठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमुद केले. मास्कचा वापर व सुरक्षित अंतर अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
  Print


News - Bhandara | Posted : 2020-09-21


Related Photos