कोविड सेंटरमध्ये बाऊन्सरने केला तरुणीवर सलग ३ दिवस बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / भाईंदर :
जूनच्या पहिल्या आठवड्यात भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यानंतर ही घटना उजेडात आली. या तरुणीला तिचा पती घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित तरुणीच्या आईने आरोपी बाऊन्सरविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित बाऊन्सरला अटक केली आहे. त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणीचे मोठी बहीण प्रसुतीदरम्यान प्रकृती खालावल्याने २६ मे रोजी दगावली होती. तिचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात जणांना भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. पीडित तरुणी आणि तिची भाची करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या दोघांना त्याच सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पीडितेने सांगितले की, २ जून रोजी रात्री दहा वाजता आरोपीने दरवाजा ठोठावला. मुलीला दूध आणि गरम पाणी देण्याच्या बहाण्याने तो आला होता. तो आतमध्ये आल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी केली. त्यानंतर याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सलग दोन दिवस त्याने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोपही तिने केला. तरूणी गरोदर राहिल्यानंतर तिने याबाबत पतीला सांगितले. आता तिचा पती घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.
  Print


News - World | Posted : 2020-09-14


Related Photos