पुरामुळे नुकसान घरमालकांसोबतच भाडेकरूंचेही झाले, मग भाडेकरू सानुग्रह मदतीपासून वंचित का?


- शासन दुजाभाव करीत असल्यामुळे समान नुकसान होऊनही भाडेकरू मदतीपासून वंचित
- जिल्हाधिकारी व शासनाने विचार करण्याची पुरपिडीतांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
३० ऑगस्ट रोजी गोसेखूर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात शेतीचे आणि नागरीकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. परंतु देसाईगंज शहरात नागरीकांना घरातील साहित्यांच्या नुकसानीबाबत सानुग्रह मदत म्हणून तातडीने ५  हजारांची मदत देण्यात आली. यामध्ये घरमालक आणि भाडेकरू असा भेदभाव करण्यात आला असून नुकसान घरमालकांसोबतच भाडेकरूंचेही झाले मग भाडेकरूंना या मदतीपासून वंचित का ठेवण्यात आले असा सवाल पूरपिडीतांनी केली आहे.
प्रचंड पुर आल्यामुळे देसाईगंज शहरातील अनेक घरे पाण्याखाली गेले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुरपिडीत परिसराचे व घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सानुग्रह अनुदान म्हणून प्रति घर ५ हजार रूपये अनुदान देण्यात आले. मात्र यावेळी ज्यांचे घर आहे त्यांनाच ही मदत देण्यात आली. ज्या घरी फक्त भाडेकरू राहतात, घरमालक राहत नाहीत अशांना मदत नाकारण्यात आली.  भाडेकरूंना गृहपयोगी साहित्य घरमालकांनी घेवून दिले असा समज करून भाडेकरूंना मदत नाकारण्यात आली. पुराने घरमालक आणि भाडेकरू असा भेदभाव करून सामान बुडविले नाही, मग शासनाने हा विचार का करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक नागरीकांचे व भाडेकरूंचे इलेक्ट्रिक सामान, गाद्या, कपडे, कपाटे, पलंग खराब झाले. भांडे वाहून गेले. अन्नधान्य खराब झाले. यामुळे भाडेकरूसुध्दा संकटात आहेत. मदत देताना शेतीचा मालक आणि कसणारा शेतकरी याप्रमाणे नियम लागू करण्यात आला काय, असा प्रश्न नुकसानग्रस्तांनी उपस्थित केला आहे. आम्ही भाड्याने राहत असलो तरी घरमालकाप्रमाणे घरात असलेले साहित्य हे आमचे आहेत. त्यामुळे आम्हालाही मोबदला मिळायला हवा, याबाबत जिल्हाधिकारी तसेच शासनाने विचार करावा, अशी मागणी अजयकुमार टाटपलान, प्रफुल गोंडाणे, मारोती वाढई, राहुल पर्वतकर, राहुल जुमनाके, भास्कर डोंगरे, डी.के. पटले, भोजराज कुमरे, प्रेमा सरकार, सचिन खोब्रागडे आदींनी केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-09-14


Related Photos