लालपरीने प्रवास करणारे १० जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / औरंगाबाद :
गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली लालपरी अर्थात एसटी वाहतूक राज्यात सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी एसटी बसला कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, औरंगाबादेत एसटी बसने दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर जवळपास 261 प्रवासी दाखल झाले होते. या सर्व प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये 10 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
औरंगाबाद शहरात रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून अँटिजन चाचणी घेण्यात  येते. पण आता एसटी बस सेवा सुरू झाल्यानंतर स्थानकावर चाचणी घेण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यात  261 प्रवाशांची चाचणी घेण्यात आली होती, यात 10 जण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. जे प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे, अशांना  कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोरोनामुळे राज्यात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे तब्बल 5 महिने एसटी बससेवा बंद होती. अखेर 20 ऑगस्टपासून  जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर  एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.

 
  Print


News - Rajy | Posted : 2020-08-23


Related Photos