भामरागडला चहुबाजूंनी पाण्याने वेढले, अनेक घरे पाण्याखाली


- पाण्याच्या पातळीत वाढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
१९ ऑगस्टपासून भामरागडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून चारही बाजूंनी भामरागडला पाण्याने वेढले आहे. भामरागडमध्ये पुन्हा एकदा मागील वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून जवळपास ६० ते ७० घरे आणि संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली आहे.
मागील दहा ते १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध नद्यांना पूर आला आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. छत्तीसगड राज्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम या नद्यांना पूर आला आहे. पर्लकोटा नदीला मोठ्या प्रमाणात दाब असल्यामुळे भामरागडमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे घरे आणि दुकाने पाण्याखाली गेले आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा आधीच देण्यात आला होता. नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दुकानदारांनीही आपआपले सामान सुरक्षित केले होते. महसूल, नगर पंचायत आणि पोलिस प्रशासन संपूर्ण पुरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-21


Related Photos