राखी बांधून ६२ जवानांना दवाखान्यातून डिस्चार्ज, तर संसर्गामुळे नवीन २४ रुग्ण आढळले


- जिल्हा सामान्य रूग्णालयातील नर्सेसनी केलेल्या सेवेच्या बदल्यात जवानांकडून आदर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ६२ सुरक्षा रक्षकांनी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांचा आदर करत त्यांच्याकडून राखी बांधून घेत डीस्चार्ज घेतला. घरापासून कोसो दूर असलेल्या जवानांना भावनिक आधार देत राखी बांधण्याची संकल्पना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मांडली. त्यानंतर जवानांशी चर्चा करून त्यांनी राखी बांधून घेण्याचे सर्वानुमते मान्य केले. यावेळी जवानांनी सर्व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे, नर्सेसचे, डॉक्टरांचे आभार मानले. आज नवीन २४ रुग्ण संसर्गामुळे कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 
काल रात्री उशिरा १८ तर आज सायंकाळी ४४ जवानांनी कोरोनावर यशस्वी मात केली. जिल्हयातील नागरिकांसह प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना कोरोना संसर्ग झाल्यामूळे त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करून पून्हा प्रत्येक बहिणीच्या व प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दाखवत आज जिल्हा सामान्य रूग्णालयातील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेतली. यावेळी सर्व बऱ्या झालेल्या रूग्णांना मिठाईचे वाटपही करण्यात आले. रक्षाबंधनाच्या दिनी सुरक्षेसाठी आम्ही पून्हा तयार आहोत हा जणू त्यांनी डीस्चार्जवेळी सर्वांना संदेश दिला. डीस्चार्ज देताना डॉ. अनिल रुडे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. माधुरी किलनाके अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.धुर्वे, डॉ. नागदेवते, शंकर  तोगरे, महेश देशमुख, स्नेहल संतोषवार, अधिसेविका अनिता निकोडे उपस्थित होते.

आज नवीन २४ कोरोना बाधित : ११ पोलीस जवानांसह इतर १३ जण आज जिल्हयात कोरोना बाधित आढळून आले. यातील सर्वचजण इतर रूग्णांच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे होते. यामध्ये 11 पोलीसांमध्ये गडचिरोली पोलीस दलातील ८, एटापल्ली हेडरी पोलीस स्टेशनचे २ तर एकजण भामरागड येथील पोलीस आहे. उर्वरीत १३ जणांमध्ये आरमोरी येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कातील ३ व एक इतर महिला, गडचिरोली सामान्य रूग्णालयातील २ रूग्ण व एक औषध स्टोअर मधील चौकीदार व गडचिरोली येथीलच धर्मशाहेत भरती असलेले ३ जण तर चामोर्शी जयरामपूर येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कातील कुंबतील इतर २ सदस्यांचा समावेश आहे.  यामुळे आजपर्यंतची कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ४९८ झाली. एकुण सक्रिय कोरोना बाधित १३२ उरले. तर जिल्हयातील बाधितांची संख्या ६३१ झाली.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-03


Related Photos