जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर आणि भामरागडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांना निलंबित करा : शिवसेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शासन नियमांचे पालन न करता मनमर्जीने कारभार करणारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मेश्राम आणि त्यांना पाठीशी घालणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी    जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे  यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुका हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मेश्राम हे अनाधिकृतपणे वारंवार गैरहजर राहतात. तसेच येथील कर्मचाऱ्यांचीसुध्दा पाठराखण करून गैरहजर कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी करून नियमित वेतन काढतात. तसेच नियमितपणे कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देवून त्यांचे वेतन थांबवितात. 
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांच्याकडे भामरागड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कनिष्ठ सहाय्यकांचे पद भरण्यात आलेले असतानासुध्दा सर्व शासकीय योजनांचे कॅश बुक तथा धनादेश स्वतःजवळ ठेवले आहे. संपूर्ण आर्थीक व्यवहार कोणत्याही शासन नियमांचे पालन न करता करतात. यामुळे अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये अपहार झालेला आहे.  असे असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंभरकर हे डॉ. मेश्राम यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेनेने  केला आहे.
डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे डॉ. मेश्राम यांच्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. यामुळे डॉ. शशिकांत शंभरकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मेश्राम यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-08-01


Related Photos