ना. विजय वडेट्टीवार यांनाच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनवावे : जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेट्टी यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनाच विकासाच्या दृष्टीकोनातून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी यांनी शासनाकडे केली आहे. ना. वडेट्टीवार हे कुशल नेतृत्व व धडाडीचे नेते असून ते स्थानिक आहेत. त्यांना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण भौगोलिक परिस्थिती व जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे. त्यांनी या जिल्ह्यातील समस्या अगदी जवळून बघितल्या असून या जिल्ह्यातील महत्त्वाच्या पण मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांची इत्थंभूत माहिती आहे. त्यांचा अधिकारी व कर्मचारयांवर वचक असल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीत चालण्यास मोलाची मदत होईल. त्यादृष्टीने वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवावे, अशीही मागणी मनोहर पाटील पोरेट्टी यांनी केली आहे. ना. वडेट्टीवार हे तडफदार व कार्यकुशल नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपाने जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा पालकमंत्री मिळेल व जिल्ह्यातील प्रश्ने मार्गी लागण्यास मोलाची मदत होईल, असा आशावादही पोरेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या जिल्ह्यातील महत्त्वाची प्रश्ने व समस्यांची त्यांना जाणीव असल्याने शासनदरबारी पोटतिडकीने ते प्रश्न आणि समस्या मांडून मार्गी लावण्यासाठी कसोसीने प्रयत्न करतील यात काहीही शंका नाही. गडचिरोली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असला तरी वडेट्टीवार यांना हा संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून त्यांनी या जिल्ह्यातील जनतेच्या समस्या अगदी जवळून बघितल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. त्यामुळे शासनाने विजय वडेट्टीवार यांच्याकडेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे सोपवावी, अशीही मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी यांनी केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-24


Related Photos