अहेरी विधानसभा क्षेत्रातील मका खरेदी करण्यास मिळाली मुदतवाढ : जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नांना आले यश


- अध्यक्षांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश ठिकाणीचे मका खरेदी केंद्र उशिरा सुरू झाले. शिवाय लाॅकडाऊनच्या काळाात अनेक शेतकऱ्यांना मका पिकाची विक्री करता आली नाही. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील मका खरेदी करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी राज्याचे बहुजन कल्याण, खर जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. या मागणीसंदर्भात कंकडालवार यांनी वारंवार शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून मका खरेदी करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रांतर्गत सन २०१९-२० या वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केलेली असून मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणार्त झालेले आहे. मात्र कोविड -१९ या विषाणूच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने सदर मका पिकाची विक्री केंद्रावर ऑनलाईन विक्री नोदणी सुद्धा झालेली नसून प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्यांच्या मक्याची मोजणी वेळेत झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच मक्याची साठवणूक केलेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर मका खराब होवून शेतकरयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील विक्री केंद्रामध्ये मका पिक खरेदीबाबत विचारणा केली असता सदर क्षेत्रातील गोदाम शेतमालाचे संपूर्णपणे भरलेले असून मका पिक खरेदी करण्यास अडचण निर्माण होत असल्याने सदर विक्री केंद्र बंद करण्यात आलेले आहे. सदर क्षेत्रात मका खरेदीस मुदतवाढ देण्यात येवून मका खरेदी कंद्र सुरू करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली होती. तसेच या मागणी संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर शासनस्तरावरून या मागणीची दखल घेत मका खरेदी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पाठपुरावाला यश मिळाले असल्याने अहेरी क्षेत्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी अजय कंकडालवार यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार व शासनाचे आभार मानले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-23


Related Photos