दोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी


 आपल्या दैनंदिन जीवनात आपण आरोग्य संपन्न रहायचं असेल तर आपणास आहारात सर्व प्रकारची प्रथिने, जीवनसत्वे यांच्यासोबत क्षार देखील मिळणं आवश्यक असतात.  यापैकी एक क्षार म्हणजे आयोडिन होय.
 आपल्याला आयोडिन आवश्यक आहे असे नव्हे तर ते अत्यावश्यक असणारे मुलद्रव्य आहे.  हल्लीच्या काळात आपण थायरॉईडचा प्रॉब्लेम असल्याचे एकतो.  हे थायरॉईड शरिरात असणाऱ्या थायरॉईड संप्रेरकावर अवलंबून असतात, आणि  शरिरात थायरॉक्सीन (टी-3) आणि ड्रायआयोडो थायरोनीन (टी-4) यांच्यासह मेंदूचा विकास या दृष्टीकोणातून आपणास आयोडिन अत्यावश्यक ठरते.
  मेंदुच्या विकासात या आयोडिनचा थेट संबध असतो.  त्यामुळे गर्भवती स्त्रियांना नियमितपणे आयोडिन आहारात ठेवावे लागते.  या आयोडिनची खूप मोठी मात्रा आवश्यक नसली तरी या स्थितीत त्या गर्भवतीला किमान सरासरी 170 मिलिग्राम आयोडिन आवश्यक असते.  सर्वसाधारण स्थितीत इतर वयात आलेल्या सर्व स्त्री आणि पुरुषांच्या आहारात 150 मिलिग्राम आयोडिनचा समावेश आवश्यक आहे.
 गर्भवती स्त्री ला त्या काळात व्यवस्थित प्रमाणात आयोडिन मिळाले नाही तर जन्माला येणारे बालक हे अपंग किंवा मानसिक व्यंगासह जन्म घेण्याची शक्यता असते.  साधारणपणे व्यक्तीचा चेहरा बदलणारे व्यंग म्हणजे गलगंड अर्थात सर्वपरिचित असा थायरॉईडचा आजार सर्वांना माहिती आहे. हा आजार आयोडिनच्या कमतरतेमुळे होत असतो.
  एका अभ्यासानुसार आढळून आले आहे की, योग्य प्रमाणात आयोडिनचे सेवन न केल्याने थायरॉईडचा आजार असणाऱ्या भारतीयांची संख्या साधारण 7.5 कोटी इतकी आहे.  आणि थायरॉईडचा त्रास जाणवणाऱ्यांची एकूण संख्या 20 कोटीपेक्षा अधिक आहे.
  जगाचा विचार करता आयोडीनच्या कमतरतेमुळे आजारी असणाऱ्यांची एकूण संख्या 150 कोटींपेक्षा अधिक आहे.
 आयोडिनच्या कमतरतेमुळे केवळ थायरॉईड अर्थात गलगंड होत नाही तर यामुळे जगभरात गर्भपात, उपजत मृत्यू तसेच जन्मजात मतीमंदपणा, तिरळेपणा, उंचीची वाढ खुंटल्याने येणारा खुजेपणा यासोबत आयोडिनच्या कमतरतेने बालक जन्मले असेल तर त्याचा बुद्ध्यांक इतरांच्या तुलनेत कमी राहून जातो.
  साधारणपणे  पाण्यात जी मुलद्रव्ये असतात त्यातून आयोडिन मिळायला पाहिजे परंतु आपल्या देशात सर्वत्र जे पेयजल आहे त्यात याचे प्रमाण खूप कमी आहे.  त्यामुळे त्याचा नियमित पुरवठा वेगळया पध्दतीने होणे आवश्यक ठरते.  भारतात यावर अभ्यास झाल्यानंतर 1962 साली सर्वप्रथम राष्ट्रीय गलगंड नियंत्रण    कार्यक्रम  सुरु करण्यात आला.  मात्र खऱ्या अर्थाने जाणीव जागृतीचे प्रमाण वाढण्यासाठी  3 दशके जावी लागली.  1992 मध्ये राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम या व्यापक भुमिकेतून काम सुरु झाले आणि सर्वापर्यंत पोहचून याचे महत्व सांगण्यास सुरुवात झाली.
 भारतांमधील साधारण 90 टक्के भागात आयोडिन सेवन योग्य प्रमाणात नसल्यामुळे किमान 10 टक्के जणांना थायरॉईडचा त्रास आहे.  यामुळे याची सक्ती करणे हाच पर्याय शिल्लक होता.  आणि हा पर्याय मिठासोबत आयोडिनच्या रुपात समोर आणला गेला.  त्यावेळी सर्वसाधारण मीठ विक्री बंद करुन आयोडिनयुक्त मीठ विकण्याची सक्ती मीठ उत्पादक कंपन्यांना करण्यात आली.
 अन्न व सुरक्षा मानक कायदा 2006 आणि त्यातील सुधारणा 2011 अनुसार विक्रीसाठी असणाऱ्या मिठात किमान 15 पीपीएम इतके आयोडिन असणे आवश्यक अर्थात बंधनकारक करण्यात आले आहे.  डॉक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात किंवा एकदा अन्न शिजवल्यावर त्यात जेवताना वरुन मीठ घेऊ नये असे नाना प्रकार सांगताना लोकांना आपण ऐकतो.
  आपल्या भारतीय जेवणाच्या थाळीची रचना बघितली तर आपणास मिठाचे महत्व कळेल.  ताट मांडल्यावर यात सर्वात प्रथम मीठ वाढले जाते.  मात्र चुकीच्या संकल्पना बाळगणाऱ्यांनी  मीठ कमी खाणे सुरु केल्याने  देखील थायरॉईडमध्ये वाढ होत आहे.
  प्रत्येक प्रोढ व्यक्तीस शरिराला आवश्यक असणारे 150 मिलिग्रॅम आयोडिन मिळवायचे असेल तर आपणास दर दिवसाला किमान 10 ग्रॅम अर्थात एक तोळा मीठ खायला पाहिजे.  आपण इतर पदार्थ खातो त्यातून अधिकतर शर्करेचे प्रमाण वाढते मात्र मिठाचे तसे नाही.  शरिराची रचनाच मुळात अशा प्रकारची आहे की, आपण क्षमतेपेक्षा जादा मुलद्रव्ये (मिनरल्स) सेवन केली  तरी त्यातील अत्यावश्यक मात्रा शरिरात शोषली जाऊन जादा मुलद्रव्ये शरिरातून बाहेर फेकली जातात.
 मीठ आणि त्यातून अत्यावश्यक असणारे आयोडिन ही आपल्या शरिराची रोजची गरज आहे. याची जाणीव ठेवून चुटकी दोन चुटकी मीठ जास्त  खायला हरकत नाही.  झालं तर याचा आरोग्य संवर्धनासाठी फायदाच होणार आहे.

   - प्रशांत दैठणकर

  9823199466  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-04


Related Photos