ग्रामोद्योगाची सुरुवात हीच गांधीजींना खरी आदरांजली : सुधीर मुनगंटीवार


- वायगाव (हळद्या )येथील हरिद्रा कंपनीचा शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
महात्मा गांधींच्या विचारानुसार खरा भारत गावात वसतो. भारताला समृद्ध करायचे असेल तर गाव स्वयंपूर्ण केले पाहिजे. गांधींच्या जयंतीदिनी महिलांच्या  हळद उद्योगाची सुरुवात झाली गांधीजींना यापेक्षा चांगली आदरांजली होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) या गावात हरिद्रा संजीवनी वायगाव हळद कंपनी चा शुभारंभ पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी झाला. जिल्हा नियोजन समिती, आमदार निधी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावेळी  उपास्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष  नितीन मडावी, आमदार समीर  कुणावर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ करुणा जुईकर, आय आय टी मुंबई चे तांत्रिक सल्लागार प्राध्यापक विशाल सरदेशपांडे, एक्सेल इंजिनियरिंग पुणे चे निखिल भावे, जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा समन्वयक स्वाती वानखेडे,तालुका अभियान व्यवस्थापक निता मेश्राम, दिनेश आरसे   आदी मान्यवर उपस्थित होते. 
अर्थमंत्री म्हणून गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भर देत असल्याचे सांगून त्यांनी लघु उद्योग सुरू करणार-या वायगावच्या बचत गटातील महिलांचे कौतुक केले. मोठ्या बाजारात या गावातील हळद विक्रिसाठी जातेय, ही इतरांनी अनुकरण करावे अशी बाब आहे.  या हळद उद्योगाला पुढे नेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे सुचविताना त्यांनी शासनाच्या इतर योजना या उद्योगाला जोडून संपूर्ण गावाला या उद्योगातून रोजगार कसा मिळेल यावर संशोधन करण्यास सांगितले.  हा उद्योग ग्रामोद्योगाचे एक चालते बोलते विद्यापीठ व्हावे अशी आशा व्यक्त करून त्यांनी या उद्योगाला भरभरून मदत करण्याची हमी सुद्धा दिली.
खासदार रामदास तडस यांनी चीनने ज्यापद्धतीने कुटीर उद्योगातून जगाची बाजारपेठ काबीज केली तसेच आपल्या देशात लघु उद्योग निर्मितीची गरज आहे. वायगाव हळदीमध्ये कर्क्युमीन हा घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जगातील संशोधक या कर्क्युमींनच्या शोधात वायगाव मध्ये येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आमदार समीर कुणावर यांनी वायगाव हळद ही कॅन्सरच्या औषधासाठी विकली गेली पाहिजे. हळदीचे तेल तयार केले तर जगातील लोक या हळदीला शोधत येतील. असा नाविन्यपूर्ण उद्योग उभारल्याबद्दल त्यांनी महिलांचे कौतुक केले. या प्रकल्पासाठी आणखी 2 कोटी रुपये देण्याची मागणी आमदार कुणावर यांनी केली.
जिल्हाधिकारी यांनी महिलांनी उद्योगाचे अर्थशास्त्र समजून घेऊन या उद्योगाचा विकास पोटच्या मुलाप्रमाणे करावा असे आवाहन करून  महिला चांगला उद्योग करू शकतात यासाठी आपली सक्षमता सिद्ध करावी असे सांगितले.
यावेळी अजय गुल्हाणे यांनी प्रस्ताविकातून प्रकल्पाबद्दल माहिती दिली. या प्रकल्पासाठी नियोजन समितीने ९५ लक्ष आणि आमदार विकास निधीतून १५ लक्ष रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 
हरिद्रा संजीवनी वायगाव हळद कंपनीच्या अध्यक्ष ज्योती पाटील यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. तसेच या प्रकल्पाची उभारणीसाठी परिश्रम करणा-या प्रकल्प संचालक डॉ करुणा जुईकर यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
या प्रकल्पाचा फायदा 
वायगावच्या  हळदिला येथील भौगोलिक गुणधर्मामुळे जी. आय. मानांकन मिळाले आहे. येथील हळदीमध्ये कर्क्युमीन या औषधी  घटकाचे प्रमाण  ६.५ ते ७ एवढे आहे. कर्क्युमीन हा घटक कर्करोगाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे येथील हळदीला बाजारपेठेत मागणी आहे. गावात २१० एकरवर हळदीचे पीक घेतले जाते. या प्रकल्पामुळे  गावातील हळद उत्पादक शेतकऱयांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल. हळदीची बाजारपेठ गावातच उपलब्ध झाली. यामुळे वेळेची व पैशाची बचत होईल. गावातील हळद लागवड क्षेत्रात वाढ होईल. दुसरे म्हणजे गावातील ४३० महिला या उद्योगात कार्यरत आहेत. या माध्यमातून गावातच चांगला रोजगार महिलांना मिळाला.

                                                                         Print


News - Wardha | Posted : 2018-10-03


Related Photos