कुच्चेरवासीयांना विजपुरवठ्याची प्रतिक्षा, अनेक वर्षांपासून जगताहेत अंधारात जीवन!


- दोन वर्षांआधी पोहचले तार, मात्र विजेचा पत्ता नाही
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनीष येमुलवार / भामरागड (अहेरी) :
भामरागड तालुका हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात रस्त्यापाठोपाठ विजेची समस्याही आ वासून उभी आहेत. शासन अनेक योजना राबविते. मात्र तालुक्यात ५० टक्के कामे निकृष्ट दर्जाची केली जातात. मागील अनेक वर्षांच्या काळात अनेक गावात विजपुरवठा पोहचलेला नाही. असेच एक गाव म्हणजे विजपुरवठ्याच्या प्रतिक्षेत असलेले कुच्चेर. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरीक विजपुरवठ्याची प्रतिक्षा करीत अंधारात जीवन जगत आहेत.
भामरागड तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या टेकला ग्रामपंचायत अंतर्गत कुच्चेर गाव आहे. या गावात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी च्या भामरागड उपकार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत दोन वर्षाआधी खांब उभे करून तार टाकण्यात आले. तसेच एक वर्षाआधी  प्रत्येकाच्या घरी वीज मीटर सुध्दा बसविण्यात आले. मात्र विजपुरवठाच करण्यात आलेला नाही. याबाबत अनेकदा महावितरण कार्यालयात माहिती देण्यात आली, ग्रामसभेमार्फत निवेदन देण्यात आले. परंतु या समस्येचे निराकरण करण्यात आले नाही. दरवर्षी रात्री - अपरात्री अंधारात जीवन जगावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा नागरीकांना जीव धोक्यात घालून अंधारात बाहेर पडावे लागते. यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून जीवाला धोका होऊ शकतो . पावसाळ्याला सुरूवात झालेली आहे. तरीही अनेकदा विनवणी करूनही महावितरण कुच्चेर गावाच्या विजपुरवठ्याच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष करीत असल्याने आम्ही असेच अंधारमय जीवन जगावे काय, असा प्रश्न येथील नागरीक विचारू लागले आहेत. तातडीने विजपुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा आम्ही महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 
याबाबत कार्यकारी अभियंता प्रभाकर मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी कुच्चेर गावातील विजपुरवठा तीन दिवसांच्या आत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी  बोलताना दिली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-07-02


Related Photos