नागपुरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, ३२ लाखाची सुपारी जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर, : अन्न व औषध प्रशासनाने आज नागपूर येथे सुपारीच्या कारखान्यावर धाड टाकून 32 लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहआयुक्त अन्न यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन नागपूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन चंद्रनगर, पायल बियर बारच्या मागे, वर्मा गॅरेजच्या बाजुला, भंडारा रोड, नागपूर या ठिकाणी असलेल्या नकुल बुधारु सारवा यांचे मालकीचे मे. नकुल सारवा सुपारी प्रोसेसिंग युनिट या पेढीच्या कारखान्यामध्ये धाड टाकून सखोल तपासणी करण्यात आली. त्या ठिकाणी सुपारीवर प्रक्रिया करीत असल्याचे आढळून आल्याने सुपारीचे नमुने घेण्यात आले. सदर सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याचे संशयवरुन उर्वरीत साठा एकूण 11 हजार 496 किलो, रुपये 32 लाख 68 हजार 860 एवढया किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनातर्फे मागील वर्षात सुपारी या अन्न पदार्थाचे एकूण 38 नमुने विश्लेषणासाठी घेवून 5,32,600 किलो, किंमत 10 कोटी 50 लाख 46 हजार 977 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच यावर्षी माहे एप्रिल ते जून या कालावधीत 11 ठिकाणी धाडी टाकून सुमारे 1,10,599 किलो, रुपये 2 कोटी 69 लाख 70 हजार 842 एवढ्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
वरील कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चं. भा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
News - Nagpur | Posted : 2020-06-24