पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा मेगा ब्लॉक : २७७ लोकल ट्रेन तीन दिवस रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या ब्लॉकमुळे लोकल प्रवासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं असं सांगण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान मिठी नदीवर असलेल्या स्क्रू ब्रीजची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा ब्लॉक जलद, तसेच धीम्या अप आणि डाउन अशा दोन्ही मार्गावर घेण्यात येणार आहे.
माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीच्या पुलाच्या कामामुळे पश्चिम रेल्वे २४-२५ आणि २५-२६ जानेवारीच्या रात्री २७७ लोकल ट्रेन रद्द करणार आहे. १८८८ मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाइल रेल्वे ब्रिज काँक्रीटच्या खांबांनी बदलला जाईल. पश्चिम रेल्वेचे अभियंते या पुलाच्या दक्षिणेकडील टोकाची पुनर्बांधणी करणार आहेत. मिठी नदीवरील पूल हा पूल मिठी नदीवर आहे. याच्या खाली पूर्वेकडून पश्चिमेकडे धावणाऱ्या धीम्या आणि जलद रेल्वे मार्गांसाठी आठ खांब आहेत. प्रत्येक खांब कच्चा लोखंडाचा बनलेला आहे, त्याचे वजन ८-१० टन आहे आणि १५-२० मीटर खोल आहे. खांब ५० मिमी जाड आणि २ फूट (६०० मिमी) व्यासाचे आहेत.
ब्लॉकदरम्यान, १५० रेल्वे सेवा अंशत: रद्द राहतील. हा ब्लॉक रात्री ११ ते सकाळी ८.३० पर्यंत असेल. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसणार आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय, तसेच मेल एक्स्प्रेसवर परिणाम होणार असून, पहिल्या ब्लॉक कालावधीत १२७ लोकल सेवा रद्द होणार असून, ६० फेऱ्या अंशतः रद्द करण्यात येतील, तर दुसऱ्या ब्लॉक कालावधीत १५० सेवा रद्द आणि ९० सेवा अंशतः रद्द होणार आहेत. या कालावधीत एकूण ४ मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत, तर १० शॉर्ट टर्मिनेट / ओरिजिनेट करण्यात येणार आहेत.
कसा असणार ब्लॉक?
२४ आणि २५ जानेवारीदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर रात्री ११ ते सकाळी ८:३० पर्यंत आणि डाउन फास्ट मार्गावर रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत ब्लॉक असेल.
तसेच २५ आणि २६ जानेवारीदरम्यान अप आणि डाउन धीम्या व डाउन जलद मार्गावर रात्री ११ ते सकाळी ८:३० पर्यंत आणि अप जलद मार्गावर रात्री ११ ते सकाळी ७:३० पर्यंत ब्लॉक असेल.
या सेवांमध्ये बदल -
रात्री ११ वाजल्यानंतर चर्चगेट ते विरार या धीम्या गाड्या मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावतील आणि माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी आणि खार रोड स्थानकावर थांबणार नाहीत.
विरार, भाईंदर आणि बोरिवली येथून धावणाऱ्या धीम्या गाड्या सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील.चर्चगेट ते दादर दरम्यानच्या सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील.
गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान काही सेवा हार्बर मार्गावर चालवल्या जातील. सकाळच्या ट्रेन सेवा फक्त विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली ते अंधेरी पर्यंत धावतील.
रद्द केलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या -
ट्रेन क्रमांक १२२६७ मुंबई सेंट्रल - हापा दुरांतो एक्सप्रेस (२५ जानेवारी)
ट्रेन क्रमांक १२२६८ हापा - मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (२६ जानेवारी)
ट्रेन क्रमांक १२२२७ मुंबई सेंट्रल - इंदूर दुरांतो एक्सप्रेस (२५ जानेवारी)
ट्रेन क्रमांक १२२८ इंदूर - मुंबई सेंट्रल दुरांतो एक्स्प्रेस (२६ जानेवारी)
News - Rajy