अमरावती : महिलांविरोधातील गुन्ह्यात वाढ तर २०२४ मध्ये बलात्काराचे ९९ व विनयभंगाचे २४४ गुन्हे दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास त्या असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्यात बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. शहर आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्यात सन २०२४ मध्ये बलात्काराचे ९९, विनयभंगाचे २४४, पळवून नेण्याचे १२६ गुन्हे दाखल करण्यात आले.
सन २०२३ च्या तुलनेत बलात्काराच्या घटनांमध्ये २० ने तर विनयभंगाच्या तक्रारीत ११४ ने घट झाली. सन २०२४ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाचे एकूण १३४ गुन्हे नोंदविले गेले. सन २०२३ मध्ये ती एकूण संख्या १७१ अशी होती. २०२२ मध्ये त्याबाबत १६० एफआयआर नोंदविले गेले होते. ९९ गुन्हे सन २०२४ मध्ये बलात्काराचे दाखल झाले आहे. त्या सर्व घटनांची उकल झाली. त्यातील आरोपींना अटक झाली.
१२६ मुला-मुलींना पळविले -
मुला-मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्यात एकूण १२६ गुन्हे नोंदविले गेले. त्यातील १२१ प्रकरणांचा उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले. सन २०२२ मध्ये १११ मुला-मुलींना फूस लावून पळवून नेले होते. त्यातील १०० गुन्हे उघड झाले. सन २०२३ मध्ये ती संख्या १२१ अशी होती.
१५० कौटुंबिक छळाचे गुन्हे -
सन २०२४ मध्ये शहर आयुक्तालयातील महिला सेलमध्ये समेट घडून न आल्याने पती व सासरच्या मंडळींविरुद्ध १५० महिलांच्या तक्रारीवरून कौटुंबिक छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले. सन २०२३ मध्ये तो आकडा १४८ असा होता.
महिलांचा विनयभंग, जबरदस्तीही -
जानेवारी ते डिसेंबरदरम्यान महिलांच्या विनयभंगप्रकरणी एकूण २४४ गुन्हे नोंदविले गेले. पैकी २३० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. सन २०२३ मध्ये तो आकडा ३५८ असा होता. तेव्हा ३५० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला होता.
शहर आयुक्तालयातील १० ठाण्यात गतवर्षी महिलांवरील बलात्काराचे ४९ गुन्हे नोंदविले गेले.
सन २०२३ मध्ये त्या शिर्षाखाली ४३ गुन्हे नोंदविण्यात आले होते. सन २०२३ मध्ये बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ७६ गुन्हे, 3 विनयभंग व पॉक्सो अंतर्गत ९५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. सन २०२४ मध्ये बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत ५० गुन्हे, विनयभंग व पॉक्सो अंतर्गत ८४ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
सन २०२३ च्या तुलनेत मागील वर्षी महिलाविषयक गुन्हे घटले आहेत. पोलिस आयुक्तालय महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी २४ बाय ७ सजग आहे. वर्षभर महिला सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविल्याचा तो परिपाक आहे.
News - Rajy