सावकारी त्रासामुळे कुटुंबाची आत्महत्या : मायलेकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात मायलेकाचा मृत्यू झाला, तर पती बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. चिखलीतील सोनवणे वस्तीत शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
शुभांगी हांडे (३६) आणि धनराज (९) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. पती वैभव हांडे (४५) यांनी फिर्याद दिली. त्यावरून संतोष कदम, संशयित महिला संतोष पवार आणि जावेद खान यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिघांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. नंतर छताच्या पंख्याला गळफास लावला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांच्या दिलेल्या माहितीनुसार, वैभव हांडे यांचे औषधी दुकान असून, त्यांनी २०१६ मध्ये संतोष कदम याच्याकडून सहा लाख रुपये, संशयित महिलेकडून दोन लाख, जावेद खान यांच्याकडून चार लाख, तर संतोष पवारकडून साडेसात लाख रुपये १०% व्याजाने घेतले होते.
त्याबदल्यात वैभव यांनी संतोष कदम याला त्याच्या मुद्दलची परतफेड करून नऊ लाख ५० हजार रुपये आणि एक एकर जमीनही लिहून दिली होती. संशयित महिलेलाही दरमहा २० हजार रुपये देऊन २० गुंठे जमीन लिहून दिली होती, तरीही तिने १४ लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला होता. जावेद खान याने दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून चार लाख ५० हजार रुपये दिले होते. संतोष पवार यालाही बहुतांश रक्कम परत दिली होती. तरीही व्याजाचे पैसे देण्यासाठी हे चौघे दमदाटी करीत होते.
मुलाला दिली सुसाइड नोट -
वैभव यांनी १४ वर्षीय मुलाला मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुलाच्या मोबाइलवर सुसाइड नोट पाठविली. मुलाने रात्री पाहिल्यावर वडिलांना फोन केला. मात्र त्यांनी उचलला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना फोन केला. पोलिसांना पाचारण केल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. वैभव यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
News - Rajy