महत्वाच्या बातम्या

 समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी न्याय विभाग व प्रशासनाने पुढाकार घ्यावा : न्यायमुर्ती उर्मिला जोशी- फलके


- विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : समाज सशक्त झाला तर देश सशक्त होईल, यासाठी समाजाला सशक्त करण्यासाठी तळागातील शोषित, वंचित, दुर्बल, गरीबांना मुख्य प्रवाहात आणन्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणे आवश्यक आहे. याकरीता शासन राबवित असलेल्या विविध योजनेच्या लाभासोबतच न्याय मिळवून देण्यासाठी न्याय व प्रशासनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उच्च न्यायालय मुबंई खंडपीठ नागपूर तथा वर्धा जिल्ह्यातील  पालक न्यायमुर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी विधी सेवा महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

आज विकास भवन येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुबंई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व वकीय संघ वर्धाच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय भारुका होते तर जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, जिल्हा सत्र न्यायाधिश एस.ए.एस.एम. आली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष सुशांत राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

संविधानाने प्रत्येक नागरिकांना आपला हक्क दिला असून न्याय आपल्या दारी हे ध्येय ठेवून विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समाजातील प्रत्येक घटकांना समान न्याय देण्याचे कार्य करण्यासोबतच शासनाच्या योजनांपासुन वंचित असलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे उर्मिला जोशी-फलके म्हणाल्या. तसेच लहान मुलांवर होणारे लैगिंक अत्याचार, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकरी आत्महत्यग्रस्त परीवाराच्या कल्याणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुध्दा यावेळी त्या म्हणाल्या. विधी सेवा महाशिबिरातून लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन इतरांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे त्या म्हणाल्या.

प्रत्येक क्षेत्रात महिला या अग्रस्थानी असून उच्च न्यायालयाला मिळालेल्या महिला न्यायमुर्ती व जिल्ह्याला मिळालेल्या जिल्हाधिकारी या महिला नेतृत्व  महिला शक्ती व स्त्री सशक्तीचे जिवंत उदाहरण असून यासाठी महिलांनी स्वत: सशक्त होणे गरजेचे आहे. शासन राबवित असलेल्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासन करीत असते. त्यांच्या साथीला न्यायालय आल्यामुळे  महाशिबिरातून योजना एकत्रितपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनाचा लाभ घ्यावा व आपली प्रगती साधावी, असे आवाहन न्या. संजय भारुका यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी विविध विभागाच्यावतीने 23 स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलवर योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. सेवा हक्क कायद्यांर्गत महसूल व इतर विभागाच्या ऑनलाईन सेवा पुरवण्यात येत असून या सेवांचाही लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. यावेळी अनुराग जैन यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे हस्ते विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशिन, कृषि साहित्य, किटकनाशक स्प्रे पंप, स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेंतर्गत धनादेश, आवास योजनेतील लाभार्थ्यांना  प्रमाणपत्र तसेच मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचा-यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यायधिश पेडगावकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा शेजवळ- काळे यांनी केले तर आभार विवेक देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी, वकील, अधिवक्ता, लाभार्थी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी सेवा महाशिबिरातील विविध योजनेच्या स्टॉलला मान्यवरांनी भेटी देऊन कृषि विभागाच्या स्टॉलचे मान्यवरांचे हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.






  Print






News - Wardha




Related Photos