ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा विरोध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्रातील ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्पानजीक कोळसा खाणी सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून देशाच्या विविध भागांमध्ये कोळसा खाणींच्या लिलावाला परवानगी देण्यात आली होती. यामध्ये ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पानजीक असणाऱ्या खाणींचाही समावेश आहे. मात्र, आम्ही राज्यातील वन्यजीवनाचे नुकसान सहन करु शकत नाही. मी यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली.
यापूर्वी १९९९ आणि २०११ मध्ये झालेल्या पाहणीनंतर या भागातील खाणींच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली होती. याठिकाणी खाणी सुरु झाल्यास ताडोबा आणि अंधारी पट्ट्यातील वन्यजीवन उद्ध्वस्त होईल. मग आपण पुन्हा या सगळ्या निरर्थक प्रक्रियेवर वेळ खर्च का करत आहोत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. 
साधारण दहा वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री जयराम रमेश यांनी खाणकामाला परवानगी नाकारून या भागातील विध्वंस रोखला होता. त्यांनी या भागाचे सर्वेक्षण करून घेतले होते. तेव्हा या भागात खाणकाम करणे योग्य नाही, असा निष्कर्ष निघाला होता. त्यामुळे मी आता पुन्हा एकदा प्रकाश जावडेकर यांना ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसराचे रक्षण करण्याची विनंती करत असल्याचे आदित्य यांनी सांगितले. 
  Print


News - Rajy | Posted : 2020-06-22


Related Photos