उदयाला विधी सेवा महाशिबीराचे आयोजन


- शासकीय योजनांचा महामेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा व जिल्हा प्रशासन वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने रविवार १९ जानेवारी रोजी विकास भवन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महामेळाव्याचा मुख्य हेतु महिलांचे सशक्तीकरण हा असून त्या व्यतिरिक्त समाजातील इतर दुर्बल, वंचित घटकांना शासकीय कार्यालयातील विविध लोककल्याणकारी योजनाबाबत जनजागृती करणे तसेच त्याचा लाभ मिळविण्यासाठी कायदेविषयक मदत करणे होय. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हातील अनेक विविध शासकीय व निम शासकीय विभागाद्वारे त्यांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्याकरीता या महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्हातील नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा व लोकांमध्ये शासकीय योजनेची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन (शासकीय योजनाचा महामेळावा) १९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता विकास भवन गांधी चौक, सेवाग्राम रोड, वर्धा येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ-नागपूर तथा वर्धा जिल्हातील पालक न्यायमुर्ती श्रीमती उर्मिला जोशी-फलके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. वर्धा जिल्हाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, संजय जु. भारुका, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक अनुराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, मुख्य कार्यकारी व वकीस संघाचे अध्यक्ष सुशांत राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, वर्धा विधी स्वयंसेवक (अधिकार मित्र) व पॅनल अधिवक्ता यांचे सहभाग असलेला शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लोकांना लाभ मिळून देण्यासाठी गट स्थापन करण्यात आला असून सदर गटाद्वारे गरजू लोकांची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे आता पर्यत एकूण १०५ लार्भात्यांना सदर योजनेचा लाभ / प्रमाणपत्रे विधी सेवा महाशिबीरात देण्यात येणार आहे. शिबीरामध्ये केवळ प्रमाणपत्रद्वारे प्रतिकात्मक योजनांचे वाटप करण्यात येणार असून प्रत्यक्षात वस्तूचे वाटप देखिल करण्यात येणार आहे.
न्यायमुर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्या हस्ते जिल्हा कृषि अधिकारी यांच्या मार्फत कृषि यांत्रिकी योजने अंर्तगत जय जवान जय किसान शेतकरी बचत गट तसेच इतर दोन व्यक्तीगत पात्र लाभार्थी शेतक-यांना ट्रक्टरचे प्रत्यक्ष वाटप सुध्दा करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जिल्हा कृषि कार्यालयामार्फत किटकनाशक फवारणी पंप लाभार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते प्रत्यक्षात वाटप करण्यात येणार आहे.
तसेच विचार विकास सामाजिक संस्था वरोरा जि. चंद्रपुर यांच्या मार्फत एकूण १० विधवा महिला शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. सदर महाशिबीरामध्ये विविध शासकीय व निमशासकीय कार्यालय जसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, साहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत तहसिल कार्यालय, नगर परिषद, जिल्हा कृषी कार्यालय, तसेच जिल्हा परिषद अंर्तगत येणारे विविध कार्यालयाचे असे एकूण २१ दालने उपलब्ध असून त्याद्वारे लोक कल्याणकारी योजनाची माहिती लोकांना देण्यात येणार असून तसेच सदर योजना अंर्तगत पात्र होणाऱ्या लोकांचे अर्ज सुध्दा प्राप्त करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय, यांच्या मार्फत सदर महाशिबीराला सहभागी होणाऱ्या व भेट देणाऱ्या लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरिकांनी महाशिबीराला उपस्थिती दर्शवून शासकीय योजनांबाबत माहिती करुन घ्यावी व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन संजय भारुका, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा व विवेक देशमुख, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांनी केले आहे.
News - Wardha