गुणवत्तापूर्ण कामासोबतच निधी वेळेत खर्च करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी.


- जिल्हा नियोजनचा आढावा
- निधी मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या निधी मधून गुणवत्तापूर्ण कामे करण्यासोबतच निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यंत्रणांना केल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, पुनर्नियोजन व दायित्व निधी या विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केले नाहीत त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निधी निर्धारित वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असून याबाबत नियोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
खरेदी प्रक्रिया ही १५ फेब्रुवारीच्या पुर्वी पूर्ण करण्यात यावी, असा शासन निर्णय जारी झाला असून ज्यांची खरेदी आहे अशा यंत्रणांनी शासन निर्णयाचे पालन करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या यंत्रणांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशा यंत्रणांनी बिडीएसवर प्राप्त निधीचा दैनंदिन आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल नियोजन विभागाला कळवावा, असेही त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे.
ज्या यंत्रणाकडे दायित्व निधी आहे त्यांनी योग्य नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाल्या की, दायित्व मागणी असल्यास ती तात्काळ कळवावी व दायित्व ३१ मार्चच्या आत खर्च करण्यात यावा. बिडीएसवर प्राप्त निधी खर्च केल्याशिवाय उर्वरित निधी प्राप्त होणार नाही याची नोंद यंत्रणांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीचा निधी शंभर टक्के खर्च होईल यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे असेही त्या म्हणाल्या. ज्या विभागांना पुनर्नियोजन मध्ये निधीची आवश्यकता आहे त्यांनी पुनर्नियोजनचे प्रस्ताव तातडीने नियोजन विभागाला सादर करावे. ज्या यंत्रणांना बचत सुचवायची आहे त्यांनी सुध्दा तात्काळ बचत सुचवावी जेणेकरून अन्य विभागाला निधी वितरित करणे सोयीचे होईल. निधी खर्च करतांना शासन नियमानुसारच खर्च करावा अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार यांनी बैठकीचे संचलन केले.
News - Wardha