गोंदिया येथील सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक ३५ हजारांची लाच स्वीकारताना अडकले एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप मधु अतुलकर (४०) व पोलिस उपनिरीक्षक उमेश ज्योतीराम गुटाळ (३१) यांना ३५ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे गांदिया येथे हवालदार असून त्याच्याविरुद्ध् ३० मे २०२० रोजी पोलिस स्टेशन गोंदिया (ग्रामीण) येथे अदखलपात्र गुन्हा नोंद नोंद झालेला आहे. सदर गुन्ह्यासंबंधाने विचारपूस करण्याकरिता पोलिस स्टेशन गोंदिया (ग्रामीण) येथील सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अतुलकर यांनी तक्रारदारास दोन -तीनवेळा पोलिस स्टेशनला बोलावले होते. त्यानंतर १७ जून २०२० रेजी सहायक पोलिस निरीक्षक अतुलकर यांनी तक्रारदारास पोलिस स्टेशनला बोलावून तुमच्या विरुद्धच्या दाखल प्रकरणी चाईल्ड क्रुॲल्टी कायद्यान्वये गुन्हा दाखल होउ शकतो. तुम्हाला नोकरीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. तुम्हाला जर तुमच्याविरुद्ध चाईल्ड क्रुॲल्टी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला अर्जदाराशी समझोता करावा लागेल. त्याकरिता तुम्हाला ३५ हजार रुपये खर्च येईल. तुम्ही सदरची रक्कम आणून पोलिस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांच्याकड द्या. त्यानंतर आम्ही तुमचा समझोता करून गुन्ह्याचा निपटारा करून देतो, असे बोलून तक्रारदाराकडे ३५ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. मात्र तक्रारदारास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने १८ जून २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे यांनी सापळा रचला. दरम्यान, ठरल्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अतुलकर यांनी ३५ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. यावरून सदर दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार शिवशंकर तुमडे, विजय खोब्रागडे, पोलिस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, नाईक पोलिस शिपाई रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला नाईक पोलिस शिपाई वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, चालक नाईक पोलिस शिपाई देवानंद मारबते यांनी केली आहे.
  Print


News - Gondia | Posted : 2020-06-19


Related Photos