जलनगर वार्ड चंद्रपूर येथे १८ लाख ८ हजारांची दारू व मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जलनगर वार्ड चंद्रपूर येथे आज, १६ जून २०२० रोजी सापळा रचून १८ लाख ८ हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना काही इसम प्रियदर्शनी चैकाकडून जलनगर वार्डाकडे एका स्काॅर्पिओ वाहनाने दारूची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून जलनगर वार्ड चंद्रपूर येथे सापळा रचला. दरम्यान, का संशयित स्काॅर्पिओ वाहनास ताब्यात घेतले असता वाहनामध्ये एक इसम होता. त्या इसमाची विचारपूस केली व वाहनाची झडती घेतली असता, वाहनात ९ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ऑफिसर चाॅईस विदेशी दारूचे ४८ बाॅक्स, १८ हजार ४०० रुपये किंमतीची एका प्लाॅस्टिकच्या पिशवीत ९२ नग विदेशी दारू, १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे देशी दारूचे १३ बाॅक्स आढळून आले. सदर दारूसाठा व ७ लाख रुपये किंमतीचे स्काॅर्पिओ वाहन (क्र. एमएच ३१ डीव्ही ३४२९) असा एकूण १८ लाख ८ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी आरोपी विष्णु घनश्याम खंजर (३४) रा. जलनगर वार्ड चंद्रपूर यास अटक करण्यात आली. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. सदर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार राजेंद्र खनके, पोलिस नाईक नईम पठाण, जमीर पठाण, अनुप डांगे, जावेद सिद्दीकी यांनी केली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-06-16


Related Photos