गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालक मागील १० महिन्यांपासून मानधनापासून वंचित


- चालक राजीनामा देण्याच्या तयारीत, ऐन पावसाळ्यात आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालकांना मागील १० महिन्यांपासूनचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्यामुळे या विभागातील चालक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता दिसून येत आहे. येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ठेकेदारीनुसार कंत्राटी पद्धतीने मानधनावर वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सदर वाहन चालकांना मागील १० महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. जिल्हा परिषदेमार्फत संबंधित ठेकेदाराला निधी उपलब्ध करून देण्यात न आल्याने वाहन चालकांचे मानधन सुद्धा थकित आहेत. जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्याच्या कारणाने संबंधित ठेकेदाराला पैसे देण्यात आले नाही. त्यामुळेच वाहन चालकांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी ओढवली असल्याने ते आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून या कालावधीत संसर्गजन्य व साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतो. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागात कसोसीने प्रयत्न करीत असतो. मात्र ऐन पावसाळ्यात आरोग्य विभागातील वाहन चालक राजीनामा देणार असल्याने विविध ठिकाणी भेटी देण्याात आरोग्य अधिकारंयाना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता दिसून येत आहे. याकडे आतातरी जिल्हा परिषद प्रशासन व अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन आरोग्य विभागातील कंत्राटी वाहन चालकांचे थकित मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-13


Related Photos