कोरोना महामारीच्या अनुषंगाने सिरोंचा व ग्लासफोर्डपेठा कन्टेनमेंट झोन घोषित - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /गडचिरोली :
सध्या गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. सदर रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापैकी सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथील रहिवासी असलेला एक रुग्ण ह्रदयविकाराच्या उपचारासाठी हैद्राबाद येथील रुग्णालयात गेला असता त्याला कोरोनाची बाधा झाली व त्याचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आलाा. अशातच १ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. प्रवासादरम्यान ग्लासफोर्डपेठा, सिरोंचा तालुका, चंद्रपूर, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी फिरलेला असल्याने सिरोंचा वाॅर्ड क्रमांक ७ व ग्लासफोर्डपेठा संपूर्ण गाव कन्टेनमेंट झोन म्हणून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी घोषित केला आहे. या कन्टेनमेंट झोनचे नियंत्रक अधिकारी म्हणून सिरोंचाचे तहसीलदार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही आदेशात म्हटले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास, आस्थापना, दुकाने, सेवा इत्यादी बाबी पूर्णतः प्रतिबंधित केल्या आहेत. सदर भागात वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश अनुज्ञेय राहील. अन्नधान्य, भोजन, विलगीकरण कक्षाशी संबंधित संसाधने यांच्याशी संबंधित व्यक्तींना तहसीलदार यांच्या पूर्वपरवानगीने अनुज्ञेय राहील. याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा वाहनाला सदर प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करण्यास मनाई असेल. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्ववस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहिता १८६० नुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ३१ मे रोजीच्या आदेशात म्हटले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-02


Related Photos