कोरोना लाॅकडाऊन काळातील गडचिरोली जिल्ह्यातील वीज बिल शासनाने माफ करावे - आमदार डाॅ. देवराव होळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरेाना महामारीमुळे महाराष्ट्रासह गडचिरोली जिल्ह्यात मागील २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामधंदे बंद असून कामगारांच्या हाताला काम नाही. या काळात शेतकरीवर्ग, कामगार व सर्वसामान्य नागरिक सुद्धा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रोजगाराअभावी संसाराचा गाडा कसा चालवावा व उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी पुरेपूर प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यात एकही कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आला नाही. केवळ बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. या जिल्ह्यातील नागरिकांनी कुठेही घराबाहेर न पडता व कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. त्यामुळे कोरोना लाॅकडाउन काळातील या जिल्ह्यातील नागरिकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. देवराव होळी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी सुद्धा केली होती. गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, अविकसित व उद्योगविरहित आहे. त्यामुळे या जिल्ह्यात रोजगाराचा गंभीर प्रश्न आहे. अशातच कोरोना लाॅकडाउनमुळे मागील दोन महिन्यांपासून नागरिकांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. तरीदेखील या जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासन व प्रशासनाला सर्वतोपरीने सहकार्य करीत अत्यावश्यक कामे वगळता नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून गडचिरोली जिल्हा ग्रीनझोनमध्ये होता. मात्र बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली. कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या आदेशाचे व नियंमाचे पालन केले आहेत व आता सुद्धा करीत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या लढाईत मोलाचे योगदान देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना लाॅकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करून सहकार्य करावे, अशीही मागणी आमदार डाॅ. देवराव होळी यांनी केली आहे. कोरोना लाॅकडाऊनमुळे नागरिकांच्या हाताला काम नसताना सुद्धा या महामारीच्या लढाईत गडचिरोली जिल्हावासियांनी सहकार्याची भूमिका निभावत आरोग्याची काळजी घेत घरीच थांबले आहेत. त्यामुळेच कोरोना महामारीतही गडचिरोली जिल्हा सुरक्षित आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा नागरिकांच्या अडचणी व समस्या लक्षात घेत किमान लाॅकडाऊन काळातील वीज बिल माफ करून अतिदुर्गम, आदिवासीबहूल, अविकसित, उद्योगविरहित व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हावासियांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही आमदार डाॅ. देवराव होळी यांनी व्यक्त केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-30


Related Photos