मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ आरोपींना सुनावली कारावासाची शिक्षा


- चंद्रपूरचे सत्र न्यायाधीश भेंडे यांचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
पोलिस स्टेशन भद्रावती अंतर्गत जैन मंदिर येथील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ आरोपींना वरोरा न्यायालयातील क्रमांक १ चे सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी १९ मे २०२० रोजी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पोलिस स्टेशन भद्रावती अंतर्गत जैन मंदिर येथील चौकीदार फिर्यादी संदीप रामचंद्र घोटेकर (३५) रा. जैन मंदिर भद्रावती हा रात्रीच्या दरम्यान आपल्या कर्तव्यावर असताना आरोपी हरजीत सिंग हरिसिंग जुनी (२०) आणि इतर ७ आरोपी सर्व. रा. परतून, जि. जालना यांनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक १३८/२०१५ भादंवि कलम ३९५, ३९७, ३९८, ३४२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस स्टेशन भद्रावती येथील सहायक पोलिस निरीक्षक डब्ल्यू. एच. हेमणे यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे १७ मे २०२० रोजी आरोपी हरजित सिंग हरिसिंग जुनी आणि इतर ७ अशा एकूण ८ आरोपींना कारावासाची शिक्षा सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकारतर्फे चंद्रपूरचे सरकारी अभियोक्ता ॲड. गोविंदा उराडे आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलिस स्टेशन भद्रावतीचे सहायक फौजदार दिलीप पोहाणे यांनी काम पाहिले.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-05-21


Related Photos