गजामेंढीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी जाळली चार वाहने, अतुल मल्लेलवार यांच्या श्री साई ट्रान्सपोर्टच्या ३ वाहनांचा समावेश


- कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान, जहाल नक्षली सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ केले होते बंदचे आव्हान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / अहेरी (गडचिरोली) :
धानोरा तालुक्यातील सावरगाव जवळील गजामेंढीच्या नजीकच्या त्रिशूल पॉईंटवर नक्षलवाद्यांनी २० मे रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास ४ वाहने जाळले आहेत. यात गडचिरोली येथील कंत्राटदार अतुल मल्लेलवार यांच्या मालकीच्या ३ वाहनांचा समावेश असून यात त्यांचे जवळपास ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. १ वाहन अन्य एका कंत्राटदाराचा आहे. या घटनेत चारही वाहनांच्या मालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जहाल नक्षली सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ नक्षल्यांनी बंदचे आव्हान केले होते. या घटनेमुळे सदर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्षली नेत्या सृजनाक्का नुकतीच एका चकमकीदरम्यान पोलिसांकडून मारल्या गेली होती. या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी २० मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा एक आठड्यापूर्वी केली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर सावरगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीच्याजवळ त्रिशूल पॉईंटवर सकाळी वाहने पेटत असेलेले चित्र दिसून आले. छत्तीसगडमधून रेती वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला आग लावून पेटवून दिले व झाड पाडले. तसेच नक्षली बॅनर बांधले आणि बंदचे आव्हान केले आहे. सदर घटनेमुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. यात तीन हायवा व एका ट्रकचा समावेश आहे.
नक्षल्यांनी ट्कच्या चालक व सहकाऱ्यांना वाहनावरून उतरवून तिथून निघून जाण्यास धमकावले. त्यानंतर चारही वाहनांना आग लावली. रात्री अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला व ट्रकचे टायर फुटल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांना घटनेचा अंदाज आला. नक्षल्यांनी रात्री घटनास्थळावर धुमाकूळ घातला. रस्त्यावर झाडे तोडून टाकली व त्यावर निषेधाचे नारे लिहिलेले लाल रंगाचे बॅनर बांधले. तसेच त्यावर २ मे च्या सिनभट्टी चकमकीचा निषेध करीत सृजनाक्काच्या मृत्यूच्या प्रित्यर्थ श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात नक्षली दहशत पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नक्षल्यांनी या भागात मोठे एम्बुश लावले असण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-20


Related Photos