संस्थात्मक विलगीकरण सामाजिक संसर्गापासून बचावासाठी : जिल्हाधिकारी दीपक सिंगला


- प्रवाशांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  कोरोना संसर्गापासून बचावासाठी प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण यशस्वी झाल्यास सामाजिक संसर्गापासून बचाव होईल  यासाठी  प्रवाशांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हयात प्रवेश केलेल्या व आरोग्य विभागाने संस्थात्मक क्वारंटाइन साठी पाठविलेल्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्हयात ४७ हजारहून अधिक प्रवाशी आले आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तरी नागरिकांनी व संबंधित प्रवाशंनी जबाबदारीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे.
जिल्हयात पाच कोरोना रूग्ण जिल्हा बाहेरून आलेले आढळून आल्याने सर्व स्तरावर प्रशासन खबरदारी घेत आहे. तसेच आत्तापर्यंत नागरिकांनी केलेल्या सहकार्यामूळे जिल्हयात रूग्ण आढळून आले नाहित. आता आपल्याच जिल्हयातील नागरिक स्वगावी परतत आहेत. त्यांनी आल्यानंतर प्रशासनाला स्वताहून माहिती देणे गरजेचे आहे. आल्यानंतर आरोग्य तपासणी करणे व आलेल्या ठिकाणाचा तपशील देणे अनिवार्य आहे. त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या गृह किंवा संस्थात्मक विलगीकरणाचा अंमलबजावणी त्यांच्याकडून केली जावी असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

येवली येथील विलगीकरणातील प्रवाशी स्वत:हून परतले 

गडचिरोली तालुक्यातील येवली शाळेतील विलगीकरण केलेले प्रवाशी हे शेतीविषयक कामे व तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी १२ दिवस पूर्ण झाल्यावर स्वगृही परतले. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. परंतू कोणीही याप्रकारे विलगीकरणातून १४ दिवसांपुर्वी जाणे योग्य नाही. प्रशासनाकडून याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. येवलीबाबत प्रवाशी पळून गेल्याच्या बातम्या विविध माध्यमांनी एकाच बाजूने दाखविल्या. याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होवून भितीचे वातावरण निर्माण होवू शकते. यासाठी माध्यमांनी आपत्ती काळातील वार्तांकन करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही बातमीला घाईने प्रसिध्द करण्यापूर्वी परिस्थिती व त्याचे परिणाम लक्षात घेवून बातमी देणे आपत्तीवेळी गरजेचे आहे. प्रशासनाची प्रतिक्रिया घेणेही आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी यांनी माध्यमांना आवाहन केले आहे. चूकीची बातमी अथवा अपूर्ण बातम्यांमूळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यास प्रशासनाकडून आपत्ती काळातील चूकीच्या वार्तांकनाबाबत संबंधित माध्यमावर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासन घेवू शकते याबाबत माध्यमांना जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-19


Related Photos