ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्हयात ३ लोकांचे नमुने आले कोरोना पॉझिटीव्ह


- तीनही व्यक्ती आले आहेत जिल्हयाबाहेरून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनात उडाली खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्हयात बाहेरून आलेल्या व प्रशासनाकडून संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्या तीन प्रवाशांचे नमुने कोरोना (कोविड -१९) पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर तीनही व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातून आले होते. त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असून काल, १७ मे रोजी रात्री उशिरा त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील वेगवेगळया दोन क्वारंटाईन केंद्रामधील व चामोर्शीमधील एका क्वारंटाईन केंद्रामधील व्यक्तींचा समावेश आहे. संबंधित कोरोना बाधित व्यक्तींना जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये हलविण्यात आले आहे. संबंधित रूग्णांकडून त्यांच्या प्रवासाचे तपशिल घेणे सुरू आहे. संबंधित पॉझिटीव्ह आलेल्या प्रवाशांना आरोग्य विभागाकडून १६ मे रोजी जिल्हयात प्रवेश केल्यानंतर संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. जिल्हयातील नागरिकांनी व बाहेरून आलेल्या प्रवाशांनी अधिक काळजी घेणे आता गरजेचे असून प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-18


Related Photos