भंडारा जिल्हयात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
रेड झोन पुणे येथून भंडारा येथे आलेल्या दोन व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता पर्यंत एकूण ३ पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हयात आढळलेले असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हयात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.
रुग्णांच्या  घश्यातील स्वॅब तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला असता तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना आजाराची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु  बोदवड उपस्थित होते.
सदर दोनही रुग्ण १६  मे २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले असून तात्काळ त्याच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाला असून तो पाझिटिव्ह आहे. पुणे येथील व्यक्ती असल्यामुळे  व भंडारा येथे येताच लगेच त्यांचे वैद्यकीय तपासणी रुग्णालयात करण्यात आल्यामुळे ते राहत असलेले क्षेत्र कंटोनमेंट झोन जाहिर करण्यात आलेले नाही.  
रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांमुळे  कोरोनाचा धोका असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक‍ क्वारंटाईन करण्यात येत आहे, असे  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अतिस्वासदाह आजाराचे सर्वेक्षण गावागावात गृहभेटी देवून करण्यात येत आहे. तसेच जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  Print


News - Bhandara | Posted : 2020-05-17


Related Photos