३० हजार रूपयांची लाच स्विकारतांना एटापल्ली येथील वनरक्षक एसीबीच्या जाळयात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयातील एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकाला ३० हजार रूपयांची लाच स्वीकारतांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे वन विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुभाष चापलाक तेजावत (३६) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे. 
तक्रारदार हे शेतीचा व्यवसाय करत असून ते जिवनगटटा ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे. तक्रारदार हे ४ मार्च २०२० रोजी शेताला कुंपन करण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने जंगलातुन पोरका आणत असतांना वनरक्षक सुभाष चापलाक तेजावन यांनी त्याचा ट्रॅक्टर पकडून त्यावर गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराची ट्रॅक्टर सदर गुन्हयात जप्त असल्यामुळे तक्रारदारास शेतीची कामे करण्यास अडचण होत होती. त्यामुळे तक्रारदार हे ट्रॅक्टर सोडविण्याकरीता उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग आलापल्ली व वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांना भेटून उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग आलापल्ली यांच्या आदेशान्वे वन गुन्हा मान्य केल्यामुळे २ हजार रुपये दंड व अवैधरित्या पोरका तोडल्याबद्दल नुकसान भरपाई रक्कम म्हणून १५ हजार रुपये अशी एकुण १७ हजार रूपये दंडाची रक्कम अटी व शर्तीवर भरली. सदर ट्रॅक्टर सोडवीण्याकरीता तक्रारदार हे वनरक्षक सुभाष चापलाक तेजावत यांना भेटले असता त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात देण्याकरिता ४० हजार रूपये लाचेची मागणी केली परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार दाखल केली. 
लाचलुचपत प्रतिबंधक  विभाग गडचिरोली चे पोलिस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांनी तक्रारदाने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनियरित्या शहानिशा करून वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय एटापल्ली येथील वनरक्षक सुभाष चापलाक तेजावत यांच्या विरूध्द सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये वनरक्षक सुभाष चापलाक तेजावत यांनी काल १२ मे २०२० रोजी तक्रारदारास ट्रॅक्टर ताब्यात देण्याकरिता ४० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३०  हजार रूपये लाच स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने त्यांना रंगेहात पकडले . याबाबत वनरक्षक सुभाष चापलाक तेजावत यांच्याविरूध्द पोलिस स्टेशन एटापल्ली येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही नागपूर ॲन्टी करप्शन ब्युरो चे पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अप्पर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक सुरेद्र गरड, नापोशि सतिश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार,देवेंद्र लोनबले, पोशि महेश कुकुडकर,चानापोशि तुळशिराम नवघरे, चापोशि घनश्याम वडेट्टीवार सर्व लाचलुचपत प्रतिबंध विभाग गडचिरोली यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-13


Related Photos