योग्य नियोजनाअभावी चामोर्शी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम होत आहे निकृष्ठ दर्जाचे, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावर सद्या सिमेंट-काॅंक्रीटचे चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम जोमात सुरू आहे. मात्र या मार्गावरील रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणावर नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे हे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचे बांधकाम करताना जमिनीची पातळी व संभाव्य धोक्याची परिस्थिती लक्षात घेता रस्ता बांधकामाची पातळी ठरविण्यात येत असते. मात्र गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामात असे कुठलेही नियोजन संबंधित कंत्राटदारांमार्फत करण्यात आले नसून सरसकट समान उंचाईनुसार बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्यात संभाव्य धोक्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात हलक्या दर्जाच्या साहित्यांचा वापर केल्या जात असल्याने सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड गडचिरोली शहरातील नागरिकांकडून होत आहे. शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करूनही सदर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्यास शासनाचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या साऱ्या प्रकाराकडे स्थानिक जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये आश्चर्य  व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील राधे बिल्डींग परिसरात तसेच समोरील रस्त्यावरून दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. शिवाय हा परिसर जलमय होत असल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबत असते. हा मुख्य मार्ग असून या मार्गावर नेहमी वर्दळ असते. त्यामुळे सिमेंट-काॅंक्रीटच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना राधे बिल्डींग समोरील रस्त्याची पातळी वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र संबंधित कंत्राटदारांकडून सरसकट रस्त्याची सारखी पातळी ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी मार्गावरील रस्त्याची पातळी दोन ते अडीच फूट उंच करण्याची गरज आहे. मात्र या गंभीर बाबींकडे संबंधित कंत्राटदारांकडून दुर्ल़़क्ष केल्या जात असून स्थानिक जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीचा डांबरी रस्ता फोडून त्याच लेव्हलचा सिमेंट रस्ता बनविण्याचा तुघलकी कारभार केल्या जात आहे. निवडणुका आल्या की मंत्री, खासदार, आमदार घरोघरी जाउन लोकांच्या भेटी घेत असतात. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून त्या सोडविण्याचे आश्वासन देत असतात. मात्र निवडणुका पार पडल्या की जनतेच्या समस्यांशी त्यांचा काही देणा -घेणा नसल्यासारखे वागत असतात. त्याप्रमाणेच एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग बनत असताना व त्याचे बांधकाम सुरू असताना ते नियोजनानुसार होत आहे की नाही, ते उत्कृष्ट दर्जाचे की निकृष्ठ दर्जाचे होत आहे याकडे लोकप्रतिनिधींचे काहीही लक्ष नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-09


Related Photos