औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
औरंगाबाद येथे रेल्वे अपघातात ठार झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या दुर्देवी अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त करतानाच परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने राज्याचे मुख्य सचिव आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2020-05-08


Related Photos