महत्वाच्या बातम्या

 गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूल विभागात समन्वय असावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- जिल्हाधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
- उल्लंघन झाल्यास गुन्हेगारांचे बंधपत्र रद्द करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात गुन्हेगारी व अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूल विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. या दोनही विभागांनी चांगला समन्वय ठेवण्यासोबतच आपल्या क्षेत्रात घडणाऱ्या गुन्ह्यांचा नियमित आढावा घेऊन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, शिल्पा सोनाले, पोलिस अधिकारी निलेश ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
बैठकीत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 अंतर्गत 107, 108, 109, 133, 145 व 174, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाचे कलम 93, मुंबई पोलिस अधिनियम अंतर्गत कलम 55, 56, 57, कायदा व सुव्यवस्था, एमपीडीए अंतर्गत दाखल गुन्हे व प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारांकडून यापुढे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होणार नाही, असा स्वरुपाचे बंधपत्र लिहून घेतले जाते. या बंधपत्रात काही अटींचा समावेश असतो. असे असतांना अटींचे उल्लंघन करून काही गुन्हेगार अवैध कृत्यात सहभागी झाल्याचे आढळून येते. अशा गुन्हेगारांचे बंधपत्र रद्द करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात एमपीडीएचे प्रस्ताव आल्यास त्यावर कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी महसूल आणि पोलिसांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक आहे, असे पुढे बोलतांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विविध कायद्यांतर्गत दाखल गुन्हे व त्यावर पुढे करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा देखील त्यांनी घेतला. प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती देखील त्यांनी जाणून घेतली.





  Print






News - Wardha




Related Photos