देशात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण तर १९५ रुग्णांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४  तासातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी जाहीर केली आहे. २४  तासात ३ हजार ९००  कोरोनाग्रस्त सापडले असून याच काळात एकूण १९५  जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही बाबतीत हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ४५  हजारापलिकडे गेला असून रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ४३३ इतकी झाली आहे. यातील१२ हजार ७२७ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा स्थलांतरीत झाले आहेत. आतापर्यंत देशात या आजारामुळे १ हजार ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ कायम राहिली असून सोमवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकड्यांनुसार २४  तासांत तब्बल ५१०  नवीन कोरोनाबाधित आढळले होते. तर १८  जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार १२३ वर पोहोचली होती. धारावीतही सोमवारी कोरोनाचे ४२  नवीन रुग्ण आढळल्याने या ठिकाणची एकूण रुग्णसंख्या ६३२ वर पोहोचली होती.
मुंबईत पालिका रुग्णालये आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या ४३६  चाचणी अहवालातून ही आकडेवारी पालिकेने जाहीर केली आहे. गेल्या एकाच दिवसांत मृत झालेल्या १८  जणांमधील दहा जणांना दीर्घकालीन आजार होते. तर तीन जणांना वार्ध्यक्य होते. १८  मृतांमध्ये १४  पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. यामुळे आता मुंबईतील एकूण मृतांची संख्या 361 वर पोहोचली असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या एका दिवसांत १०४  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कोरोनामुक्त होणार्‍यांचा आकडा १ हजर ९०८  वर पोहोचला आहे. दरम्यान, माहीममध्ये तीन नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ७१  वर गेली आहे. तर दादरमध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ५४  वर पोहोचली आहे.  Print


News - World | Posted : 2020-05-05


Related Photos